महिला कर्मचाऱ्यांचा आगार व्यवस्थापक कार्यालयाबाहेर आक्रोश
प्रतिनिधी / कोल्हापूर
सकाळपासून भजनात दंग झालेले कर्मचारी दुपारच्या सुमारास जेवणासाठी निघत होते…टप्प्या टप्प्याने रेस्ट रूमकडे जेवण करण्यासाठी जात असतानाच दुपारी दीडच्या सुमारास कोल्हापूर आगारातील पाच जणांचे निलंबन केल्याची बातमी धडकली. अचानक आलेल्या या बातमीने संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. कर्मचाऱ्यांनी थेट आगार व्यवस्थापक कार्यालय गाठून तेथे जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला कर्मचारी आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयाबाहेर पडताना पाऊस सुरू झाला. आपल्या कर्मचारी भावांवर झालेल्या कारवाईने महिलावर्गाच्या अश्रूंचा बांध मात्र फुटला.
एसटी संपाची तीव्रता वाढत असताना कोल्हापूर आगारातील वाहक उत्तम पाटील, वाहक विनायक भोगम, वाहक हेमंत काशिद, चालक कुबेर वासुदेव आणि यांत्रिकी विभागातील नामदेव रोडे यांचे निलंबन केल्याची नोटीस आगार व्यवस्थापक कार्यालयाबाहेर लावली. ही माहिती मिळताच सर्व कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापक कार्यालयाकडे मोर्चा वळविला. कारवाई करायची तर सर्वांवर करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी जोर धरून लावली. हा सर्व प्रकार जवळपास तासभर सुरू होता. यावेळी वातावरण तणावपूर्ण झाल्याने बंदेबस्तासाठी असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली.
आम्ही रडणारे नाही, लढणारे...
एसटी कर्मचारी बंधूंवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सर्वच महिलावर्गांना अश्रू आवरता आले नाही. एका महिला कर्मचारीला तर हुंदके आवरता येत नव्हते. यावेळी त्यातीलच काही जणींनी तिला धीर देत आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत. लढा चालूच ठेवायचा आहे, असे सांगितले. भले आम्हाला या ठिकाणी रात्रंदिवस राहावे लागले तर चालेल, असा निश्चय व्यक्त केला. यावेळी भावूक झालेल्या गीता पाटील, सविता बागणीकर या महिला कर्मचाऱ्यांना डोळयातून पाणी काढू नका.. असे आवाहन इतर कर्मचारी करत होते.
प्रशासनाकडून दिशाभूल
राज्यभरात कुठेही लालपरी धावलेली नाही. कोल्हापुरातूनही कोणती गाडी सुटलेली नाही. कोल्हापुरात खासगी शिवशाही बस शुक्रवारी आली होती. मात्र येथील कर्मचाऱ्यांनी ती परत धाडली. आम्हाला प्रवासी वर्गाचा पाठिंबा मिळत आहे. मात्र प्रशासनाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
पावसामुळे संपकरी एसटी स्टँडमध्ये
दुपारच्या सुमारास पाऊस पडत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी बसस्थानकात जाऊन ठिय्या मांडला. तिथेच एकत्र जमत जोरदार घोषणाबाजी केली.
जिह्यातील जवळपास 4800 कर्मचारी संपात
कोल्हापूर जिह्यातील जवळपास 4800 कर्मचारी संपात सहभागी आहेत. कोल्हापूर आगारामधील वाहक, चालक, वाहतूक नियंत्रक, लेखनिक, यांत्रिकी विभागातील कर्मचारी सहभागी आहेत.