ऑनलाईन टीम / चंदीगढ :
चीन आणि पाकिस्तानकडून होणारा कोणताही हल्ला थोपवण्यास सक्षम असलेल्या एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम एस-400 चे पहिले युनिट पंजाबमध्ये तैनात करण्यात आले आहे.
रशियाकडून खरेदी केलेली अत्याधुनिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली पंजाबमधील हवाई दलाच्या पाच तळांपैकी एका तळावर तैनात करण्यात आली असून, हा तळ पाकिस्तानच्या सीमेच्या सर्वात जवळ आहे. या क्षेपणास्त्र प्रणालीच्या तैनातीमुळे संरक्षण क्षमता मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. शत्रूचा 400 किमी दूर अंतरावरून होणारा कोणताही हल्ला निष्क्रिय करण्यास ही क्षेपणास्त्र प्रणाली सक्षम आहे. ही जगातील सर्वात प्रगत प्रणालींपैकी एक आहे.
एस-400 चार वेगवेगळय़ा क्षेपणास्त्रांनी सुसज्ज
एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली चार वेगवेगळय़ा क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. जी शत्रूची विमाने, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि एडब्ल्यूएएस विमानांना 400 किमी, 250 किमी, मध्यम पल्ल्याची 120 किमी आणि कमी पल्ल्याची 40 किमीवर मारा करू शकते.