वार्ताहर / कास :
जावली तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या ऐकीव धबधब्यावर आज प्रशासनाच्या वतीने अचानक कोरोनाच्या टेस्ट कॅम्प घेण्यात आला.अचानक होत असलेल्या या टेस्टमुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा मंडल अधिकारी व कॅम्पचे नोडल अधिकारी एस. व्ही. मुळीक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता पवार व कर्मचारी यांच्या माध्यमातून हा कॅम्प आयोजित केला.या ठिकाणी आरटीपीसीआर आणि ॲन्टीजेन अशा दोन्ही टेस्ट करण्यात आल्या.
शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक जण कास पठार, वजराई धबधबा, ऐकीव धबधबा या ठिकाणी पर्यटनास येत आहेत. मान्सूनच्या दमदार आगमनाने सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यातच पावसाने उघडीप दिल्याने हिरवाईने परिसर चांगलाच नटला आहे. अशा आल्हाददायक वातावरणात पर्यटनासाठी प्रत्येकजन यायला इच्छूक आहे. पण कडक विकेंड लाॅकडाऊनमुळे प्रशासन कडक धोरण राबवत असल्याने पर्यटनावर व पर्यटकांवर चांगलेच निर्बंध येत आहेत. त्यात आता थेट पर्यटन स्थळांवर कोरोना टेस्ट चालू केल्याने कारवाईचा धसका पर्यटक घेणार आहेत.