वृत्तसंस्था/नवी दिल्ली
येथे 5 ऑक्टोबरपासून सुरू होणारे नेमबाजांसाठी ऐच्छिक नेमबाजी प्रशिक्षण सराव शिबीर लांबणीवर टाकण्याचा निर्णय राष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनने घेतला आहे. या सराव शिबिराला भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने आपली अधिकृत मान्यता दिली असतानाही प्रशासकीय सक्तीमुळे हे ऐच्छिक शिबीर लांबणीवर टाकावे लागत आहे, अशी माहिती फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
देशातील नेमबाजांसाठी प्रशिक्षण सराव शिबीर घेण्याचा निर्णय झाला होता पण गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत देशातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असल्याने सदर शिबीर दोनवेळा लांबणीवर टाकावे लागले. ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा अखिल भारतीय रायफल संघटनेच्या निर्णयामुळे सदर शिबीर पुढे ढकलण्यात आले होते. येथील डॉ. कर्नी सिंग नेमबाजी संकुलात सदर नेमबाजी शिबीर 5 ऑक्टोबरपासून घेतले जाणार होते. या शिबिरात रायफल आणि पिस्तुल नेमबाजीचा सराव आयोजित केला होता पण पुन्हा हे शिबीर दुसऱयांदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. या शिबिराची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून फेडरेशन नेमबाजांच्या संपर्कात राहील, असे फेडरेशनचे सचिव राजीव भाटिया यांनी सांगितले. 8 जुलैपासून डॉ कर्नी सिंग नेमबाजी संकुल ऍथलीट्ससाठी खुले करण्यात आले.