दोडामार्ग – वार्ताहर-
दोडामार्गात जेष्ठ नाट्य दिग्दर्शक व नाटककार गोविंद महाले व नाट्यप्रेमींच्या पुढाकाराने ऐतिहासिक “रणांगण” या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून येत्या मार्च – एप्रिल मध्ये हे महानाट्य नाट्यरसिकांच्या भेटीला येणार आहे. या महानाट्यासाठी रविवारी १९ डिसेंबरला ऑडिशन घेतली जाणार आहे. अशी माहिती गोविंद महाले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी गौतम महाले, सागर नाईक, किरण काळबेकर, प्रसाद राणे व वैभव नाईक उपस्थित होते.
श्री महाले पुढे म्हणाले की, पानिपत युद्धातील मराठ्यांच्या जिगरबाज लढाईचा इतिहास पुन्हा एकदा या महानाट्याच्या माध्यमातून जिवंत उभा होणार आहे. तब्बल ५० हुन अधिक कलाकारांचा सहभाग या प्रयोगात असणार असून स्थानिक कलाकारांना त्यात अभिनयाची संधी मिळणार आहे. यात अधिकाधिक स्थानिक कलाकारांनी सहभाग घ्यावा असे श्री. महाले म्हणाले. दोडामार्गातील नाटकांचे चाहते व दाते यांच्या खास आग्रहाखातीर या महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे. या महानाट्याच्या माध्यमातून पेशवे कालीन इतिहास सर्वांसमोर मांडण्यात येणार आहे. या महानाट्यासाठी खुल्या थिएटर सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. या नाट्यामध्ये अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा तसेच अन्य तत्सम साधन समुग्रीचा वापर केला जाणार आहे. दोडामार्गात यापूर्वी करिन ती पूर्व, रायगडला जेव्हा जाग येते यांसारखी महानाट्ये ज्या ताकदीने साकारण्यात आली होती त्याच पद्धतीने रणांगण देखील सादर केले जाणार आहे.
दोडामार्ग मधील स्थानिक कलाकारांना या महानाट्यात संधी दिली जाणार असून त्यासाठी 19 डिसेंबर रोजी ऑडिशन घेण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी 11 वा. पासून ऑडिशनला सुरुवात होणार आहे. इच्छूक कलाकारांनी किरण काळबेकर (9823979493), गौतम महाले (7030889289), व सागर नाईक (9561464230) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. महाले यांनी केले आहे.