आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा
शारजाह / वृत्तसंस्था
कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध धडाकेबाज विजय संपादन केल्यानंतर मनोबल उंचावलेला पाकिस्तानचा संघ आज (मंगळवार दि. 26) आयसीसी टी-20 विश्वचषक साखळी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. भारताची 29 वर्षांची अपराजित मालिका खंडित केली असल्याने हेच अनेक पाकिस्तानी चाहत्यांसाठी निर्भेळ यश आहे. मात्र, बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने अद्याप आपल्याला या स्पर्धेत बराच पल्ला गाठायचा असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, पाकिस्तान-न्यूझीलंड लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
भारताविरुद्ध विजय संपादन केल्याने पाकिस्तानी पथकात आनंदोत्सव साजरा होणे साहजिकच असले तरी पाकिस्तानच्या माजी कर्णधारांनी संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी अद्याप बरेच प्रयत्न करावे लागतील, असा सावधगिरीचा इशारा दिला आहे.
भारताला नमवल्यानंतर पाकिस्तानचे लक्ष्य न्यूझीलंडविरुद्ध वचपा काढण्याचे असेल. याच न्यूझीलंड संघाने पाकिस्तानमध्ये दाखल झाल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव चक्क मालिका रद्द करत मायदेशाचा रस्ता धरला होता. तो राग पाकिस्तानी पथकात असणे साहजिक आहे. यजमान पाकिस्तानने त्यावेळी सुरक्षिततेचा कोणताही धोका नसल्याचा दावा केला होता.
न्यूझीलंडचा संघ दौरा सोडून मायदेशी परतल्यानंतर इंग्लंडनेही पाकिस्तान दौरा रद्द केला आणि याचा पाकिस्तानच्या वर्ल्डकप तयारीवर विपरीत परिणाम झाला होता.
भारताविरुद्ध लढतीत पाकिस्तानच्या फलंदाजी लाईनअपची पूर्ण पारख झालेली नसली तरी बाबर आझम व रिझवान मात्र सर्वोत्तम बहरात आहेत, याची प्रचिती आलेली आहे. फखर झमन, मोहम्मद हाफीज व शोएब मलिकचा मध्यफळीत समावेश असून न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर ते कडवे आव्हान उभे करु शकतात.
भारताविरुद्ध लढतीत पाकिस्तानने 7 गोलंदाज वापरले आणि यात अनुभवी शोएब मलिकला एकही षटक टाकावे लागले नाही. शाहीन आफ्रिदी नव्या चेंडूवर सन्सेशनल ठरला आणि न्यूझीलंडचे सलामीवीर त्याचे इन-स्विंगिंग यॉर्कर्स कसे खेळतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
प्रतितास 145 ते 150 किमी वेगाने मारा करु शकणाऱया हॅरिस रौफने डेथ ओव्हर्समध्ये आपल्याला सामोरे जाणे आव्हानात्मक असेल, हे यापूर्वी दाखवून दिले आहे.
न्यूझीलंडसमोर खराब फॉर्मची चिंता
केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाला यापूर्वी ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध दोन्ही सराव सामन्यात पराभव पत्करावे लागले असून हा खराब फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा असेल. कर्णधार केन विल्यम्सनचा बॅड पॅचमधून जात असल्याने याचाही किवीज संघाला सातत्याने फटका बसत आला आहे.
विल्यम्सन अद्यापही ढोपराच्या दुखापतीने त्रस्त असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीदरम्यान ही दुखापत आणखी चिघळली असल्याचे किवीज मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी म्हटले आहे. विल्यम्सनला यापूर्वी इंग्लंडविरुद्ध लढतीत फलंदाजीला उतरता आले नव्हते.
किवीज गोलंदाजी भक्कम
न्यूझीलंड संघाकडे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. पण, त्यांच्या फलंदाजांना भरीव कामगिरी करणे भाग असेल. तूर्तास, अनेक चिंता असूनही आयसीसी स्पर्धांमध्ये उत्तम प्रदर्शन ही त्यांची जमेची बाजू आहे आणि ते उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लंका-बांगलादेश लढतीत ज्याप्रमाणे दिसून आले, त्याप्रमाणे शारजाहची खेळपट्टी आपला स्वभाव बदलत चालली असून आजच्या लढतीत फलंदाजांसाठी ही पर्वणी ठरु शकेल, असे प्रथमदर्शनी संकेत आहेत.
संभाव्य संघ
न्यूझीलंड ः केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड ऍस्ले, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनव्हे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टील, काईल जेमिसन, डॅरेल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलीप्स, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट, ईश सोधी, टीम साऊदी.
पाकिस्तान ः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमन, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, हसन अली, हॅरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी, इमाद वासिम, शदाब खान, मोहम्मद नवाझ, असिफ अली, हैदर अली, सर्फराज अहमद, मोहम्मद वासिम, सोहेब मक्सूद.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.