ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धा- मनू भाकरला कांस्यपदक
वृत्तसंस्था/ लिमा
भारताचा युवा नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवत पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन्समध्ये सुवर्णपदक पटकावले. याशिवाय महिलांमध्ये नाम्या कपूरने सुवर्ण तर मनू भाकरने कांस्यपदक मिळविले.
तोमरने सोमवारी पात्रता फेरीत 1185 गुण नोंदवत विश्वविक्रमाची बरोबरी केली होती. त्यानंतर अंतिम फेरीत त्याने 463.4 गुणांचा नवा विश्वविक्रम नोंदवत सुवर्ण पटकावले. दुसऱया स्थानावरील फ्रान्सच्या लुकास क्रीझपेक्षा तो जवळपास 7 गुणांनी पुढे होता. लुकासने 456.5 गुण घेत रौप्य, अमेरिकेच्या गव्हिन बार्निकने 446.6 गुण घेत कांस्यपदक मिळविले. या प्रकारात भाग घेतलेल्या अन्य भारतीय नेमबाजांत संस्कार हवेलियाने 1160 गुण घेत 11 वे, पंकज मुखेजाने 1157 गुणांसह 15 वे, सरताज तिवानाने 1157 गुणांसह 16 वे, गुरमान सिंगने 1153 गुणांसह 22 वे स्थान मिळविले.
नाम्या कपूरची लक्षवेधी कामगिरी
तत्पूर्वी, भारताच्या 14 वर्षीय नेमबाज नाम्या कपूरने महिलांच्या 25 मी. पिस्तूल नेमबाजीत मनू भाकर व अन्य अनुभवी नेमबाजांना मागे टाकत सुवर्ण पटकावले. नाम्याची ही पहिलीच स्पर्धा असून सुप्रसिद्ध पुरुष नेमबाज संजीव राजपूतची ती पुतणी आहे. ती सध्या नवव्या इयत्तेत शिकत असून गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या चाचणीत दुसरे स्थान मिळविल्यानंतर तिची राष्ट्रीय ज्युनियर संघात निवड झाली. आतापर्यंत अपरिचित असलेल्या नाम्याने सोमवारी येथील स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर मात्र ती प्रकाशझोतात आली आहे. अंतिम फेरी गाठलेल्या आठ स्पर्धकांतील ती सर्वात तरुण नेमबाज आहे. ती आता आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पदक जिंकणारी भारताची सर्वात कमी वयाची नेमबाज बनली आहे. गेल्या तीन वर्षापासून ती मोठी बहीण खुशीसमवेत नेमबाजीचा सराव करीत असून देशाबाहेर प्रवास करण्याची तिची ही पहिलीच वेळ असल्याचे तिचे वडील प्रवीण यांनी सांगितले.
अंतिम फेरीत नाम्या कपूरने 36 गुण नोंदवत पहिले स्थान मिळविले. फ्रान्सच्या 19 वर्षीय कॅमिले जेद्रेजेवस्कीने (33) दुसरे व भारताच्या 19 वर्षीय मनू भाकरने (31) तिसरे स्थान मिळविले. कॅमिले व मनू यांच्यात दुसऱया स्थानासाठी शूटऑफ घेण्यात आले. त्यात कॅमिलेने बाजी मारल्याने मनूला तिसऱया स्थानावर समाधान मानवे लागले. मनू भाकरने याआधीच या स्पर्धेत दोन (वैयक्तिक 1, मिश्र सांघिक 1) सुवर्णपदके पटकावली आहेत. अन्य एक भारतीय रीदम सांगवानने (27 गुण) चौथे स्थान मिळविले. या प्रकारात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले. नाम्या कपूरने पात्रता फेरीत 580 गुणांसह सहावे स्थान मिळविले होते तर भाकर (587) व सांगवान (586) यांनी पहिले दोन क्रमांक मिळविले होते.
भारताने या स्पर्धेत 8 सुवर्ण, 6 रौप्य व 3 कांस्यसह एकूण 17 पदके मिळवित पहिले स्थान मिळविले आहे. ऑलिम्पिकनंतर होत असलेली ही पहिलीच मोठी नेमबाजी स्पर्धा असून 32 देशांतील सुमारे 370 स्पर्धकांनी त्यात भाग घेतला आहे.