तरुण भारत संवाद
प्रतिनिधी/सोलापूर
विद्युत मिटरमध्ये फेरफार करुन त्यावर लावलेले सील काढून ऑईल मिलच्या व्यवसायासाठी वीजचोरी करणारा ऑईल मिल मालक भीमाशंकर मल्लिकार्जुनप्पा ढंगापुरे (रा. भवानी पेठ, सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी 14 लाख 48 हजार रुपये दंड व एक वर्षाची शिक्षा बुधवारी सुनावली.
या खटल्याची हकीकत अशी की, ढंगापुरे यांनी त्यांच्या ऑईल मिलच्या व्यवसायाकरीता राज्य विज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा घेतला होता. त्या मिटरची 6 ऑक्टोबर 2008 रोजी कनिष्ट अभियंता पडाल यांनी तपासणी केली. त्यावेळी मिटरच्या डिस्प्लेमध्ये दोन फेजला करंट येत नसल्याचे व तसेच दोन फेजमधील वीज वापर नोंदविला जात नसल्याचेही दिसून आले. यामुळे त्यांनी हे मिटर जप्त करुन त्याची तपासणी केली. तपासणीमध्ये मिटरचे टर्मिनल कव्हर तोडून पुन्हा चिकटवल्याचे आढळून आले. त्याचबरोबर मिटरचे स्टिकर सील फाढून काढल्याचे उघड झाले. यावरुन मिटर खोलून त्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणीचा अहवाल तपासणी अधिकाऱयाने दाखल केला होता.
त्यानंतर आरोपीला चोरुन वीज वापरल्याबद्दलचे बिल देण्यात आले होते. परंतु त्याने ते भरले नसल्याने, वीज वितरण कंपनीने त्याच्याविरुध्द पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी या गुह्याचा तपास करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकातर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीला न्यायालयाने दंड आणि शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे ऍड. रामपुरे तर आरोपीतर्फे ऍड. नागेश कुलकर्णी, ऍड. विजय पाळंदे यांनी काम पाहिले.
न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
या गुह्यातील तपास अधिकाऱयाने मिटर जप्त केले नाही. तसेच आरोपीविरुद्ध तीन वर्षे उशिराने दोषारोपपत्र पाठविले. त्याचबरोबर दोषारोपपत्र सादर करण्याबाबत झालेल्या उशिराचे स्पष्टीकरणही दिले नसल्याने न्यायालयाने तपासी अधिकाऱयाबद्दल नाराजी व्यक्त केली.