ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच देशाला तिसऱ्या लाटेची भिती सतावत आहे. कोरोनाच्या डेल्टा या धोकादायक व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊन ती ऑक्टोबरमध्ये उच्चांक गाठू शकते. या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ञांच्या समितीने दिला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ञांच्या समितीने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, कितीही खबरदारी घेतली तरी कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर अखेरपर्यंत येण्याची शक्यता आहे. इतर दोन लाटेंच्या तुलनेत ही लाट सौम्य असेल. मात्र, देशात लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना या लाटेचा अधिक धोका आहे. लहान मुलांवरील उपचारांसाठी आपल्याकडे पुरेशा आरोग्य सुविधाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दिव्यांग तसेच सहव्याधी असलेल्या लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचनाही या अहवालात करण्यात आली आहे.