ऑनलाईन टीम / लंडन :
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे स्वतंत्र परिक्षण घेतल्यानंतर आणि यूकेच्या आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर या लसीची मानवी चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अॅस्ट्राझेनेकाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.
मागील आठवड्यात या कोरोना लसीच्या मानवी चाचणीत सहभागी असलेली व्यक्ती आजारी पडल्यामुळे ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीने आपल्या लसीची मानवी चाचणी थांबवली होती.
‘AZD1222’ असे या लसीचे नाव आहे. लसीच्या चाचणीचा पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. सध्या या लसीचा तिसरा टप्पा सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ अॅस्ट्राझेनेका नावाच्या औषध बनवणाऱ्या कंपनीबरोबर ही लस तयार करत आहे. अमेरिकेच्या या फार्मा कंपनीशी भारतातील सिरम इन्स्टिट्यूटचा करार झाला आहे.