ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना लसीच्या मानवी चाचणीत सहभागी असलेली व्यक्ती आजारी पडल्यामुळे ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्ट्राझेनेका कंपनीने आपल्या लसीची मानवी चाचणी थांबवली आहे. अस्ट्राझेनेकाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.
‘AZD1222’ असे चाचणी थांबवण्यात आलेल्या लसीचे नाव आहे. अस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने ही लस तयार केली होती. लसीच्या चाचणीचा पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडल्यामुळे ही लस सर्वांत आधी उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आशेचा किरण म्हणून या लसीकडे पाहिले जात होते.
ऑक्सफर्ड अस्ट्राझेनेका नावाच्या औषध बनवणाऱ्या कंपनीबरोबर ही लस तयार करत आहे. अमेरिकेच्या या फार्मा कंपनीशी भारतातील सिरम इन्स्टिट्यूटचा करार झाला आहे. अस्ट्राझेनेकाच्या मते, ही रुटीन स्थगिती असून, संबंधित व्यक्तीच्या आजारपणाबद्दल माहिती नसल्याने तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.