82 वर्षीय वृद्धाला सर्वप्रथम मिळाली लस
ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका यांच्या भागीदारीत विकसित कोरोनावरील लस कोविशिल्डचे ब्रिटनमध्ये सोमवारपासून वितरण सुरू झाले आहे. तेथे सर्वप्रथम 82 वर्षीय वृद्धाला कोविशिल्ड लस देण्यात आली आहे. ब्रायन पिंकर नावाचा हा वृद्ध डायलेसिसचा रुग्ण असून त्याला ऑक्सफोर्डमधील एका रुग्णालयात ही लस देण्यात आली आहे.
कोविशिल्डला ब्रिटनच्या औषध नियामकीय संस्थेने 30 डिसेंबर रोजी मर्यादित आपत्कालीन वापराची मंजुरी दिली होती. ऑक्सफोर्डची लस अत्यंत स्वस्त असून ती सामान्य फ्रीजमध्ये ठेवता येते. ब्रिटनने यापूर्वीच कोविशिल्डच्या 10 कोटी डोसची ऑर्डर दिलेली आहे. तर फायजर या अमेरिकेच्या कंपनीची लसही लाखो ब्रिटिश नागरिकांना देण्यात आली आहे.
100 टक्के सुरक्षा देणार
ही लस विषाणूच्या नव्या स्ट्रेनच्या विरोधातही उपयुक्त ठरणार आहे. कोरोनाच्या विरोधात ही लस 100 टक्के सुरक्षा प्रदान करणार असल्याचा दावा एस्ट्राजेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्क सोरियट यांनी केला आहे.