प्रतिनिधी / बेंगळूर
चामराजनगरमध्ये ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी गुलबर्गा जिल्हय़ाच्या अफझलपूर तालुका इस्पितळात ऑक्सिजनअभावी चार कोविड रुग्ण दगावले आहेत. राज्यात ऑक्सिजनचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा भासत असून अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे.
अफजलपूर तालुका इस्पितळात मंगळवारी पहाटे 4.30 च्या सुमारास चार बाधितांचा मृत्यू झाला. तर येथील 20 हून अधिक रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या घटनेप्रकरणी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी गुलबर्गा जिल्हा आरोग्य अधिकाऱयांशी संपर्क साधून माहिती घेतली. या इस्पितळात एकूण 30 कोरोना रुग्ण दाखल झाले आहेत. मात्र, सोमवारी येथे केवळ 6 ऑक्सिजन सिलिंडर्स होते.
राज्यात मंगळवारी 44,631 नवे रुग्ण
राज्यात मंगळवारी 44,631 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दिवसभरात 24,441 जण कोरोनामुक्त झाले. तर मागील चोवीस तासांत 292 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात मंगळवारी 1,53,707 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण 16,90,934 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर त्यापैकी एकूण 12,10,013 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण 16,538 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 4,64,363 इतकी आहे.