लंडन येथे सेवा बजावणारे डॉ. सैफ मेनन यांची प्रतिक्रिया : तरुण भारतला पत्र
प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या लाडक्मया बेळगाव शहरामध्ये सध्या माणुसकीला आव्हान देणाऱया कोरोनासारख्या शत्रूने डोकेवर काढले आहे. अशावेळी स्वयंसेवी संस्थांद्वारे पुरविण्यात येणारा ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा थांबविण्याचा प्रशासनाचा निर्णय हा जनहितविरोधी आणि गरिबांच्या विरोधातील आहे, अशी प्रतिक्रिया बेळगावचेच असलेले व सध्या लंडन येथे सेवा बजावणारे डॉ. सैफ मेनन यांनी दिली आहे.
‘तरुण भारत’ला पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, बेळगावमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून स्वयंसेवी संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सामान्य माणसांच्या सर्व आशा संपत असताना या संस्था आशेचा किरण म्हणून उभ्या राहिल्या. मात्र, आता प्रशासनाने घेतलेला निर्णय हा या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य आणि मनोबल खच्चीकरण करणारा आहे.
कोणत्याही स्वयंसेवी संस्था फायद्यासाठी काम करत नसून विनामूल्य काम करत आहेत. त्यांच्यामुळे प्रशासनाला एकप्रकारे मदत होत आहे. स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्यात मैत्रभावना असायला हवी. परंतु, प्रशासनानेच ती कमी केली आहे. वैद्यकीयदृष्टय़ा ऑक्सिजन हे जीव वाचविणारे औषध आहे. सध्या ऑक्सिजन बेड मिळविणे हे आव्हान आहे. अशावेळी फक्त स्वयंसेवी संस्थांमुळेच अनेक कोरोनाबाधितांना ऑक्सिजन सिलिंडर्स मिळाल्याने त्यांचे जीव वाचले आहेत.
प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार करावा
सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि आपले युद्ध न दिसणाऱया शत्रूशी आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व स्वयंसेवी संस्थांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करण्याची परवानगी द्यावी. डॉक्टरांच्याइतकेच कार्यकर्तेसुद्धा कोरोना योद्धेच आहेत. धोका पत्करून ते सेवा करत आहेत. तेव्हा प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.