ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने देशात ‘रेमडेसिवीर’ औषधाची कमतरता निर्माण झाली आहे. या कमतरतेवर केंद्र सरकारने म्हटले आहे की, रुग्णालयात दाखल झालेल्या ऑक्सिजनवर आधारित रुग्णांनाच ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन देण्यात यावे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येऊ नये.
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, ‘रेमडेसिवीर’चा वापर केवळ अशा रुग्णांसाठी केला पाहिजे, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आणि बाहेरून ऑक्सिजन देण्याची आवश्यकता आहे. घरी आणि सौम्य लक्षणे असलेल्या संसर्गाच्या बाबतीत त्याचा वापर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे तो औषधांच्या दुकानातून खरेदी केला जाणार नाही. परिणामी योग्य रुग्णांना हे इंजेक्शन मिळेल आणि त्याचा तुटवडा निर्माण होणार नाही.