वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाच्या फ्रांचायजीनी देशातील कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन पुरवठय़ासाठी आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे परिस्थिती चिंताजनक झाली असून कोरोनाग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आरसीबी संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. आरसीबी फ्रांचायजीनी कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी आरसीबीच्या सोमवारच्या सामन्यात खेळाडूंनी परिधान केलेल्या जर्सीचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती कोहलीच्या ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. बेंगळूर तसेच इतर शहरामध्ये ऑक्सिजनची कमतरता मोठय़ा प्रमाणात भासत असून कोरोनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत आरसीबीतर्फे दिली जाणार आहे. आरसीबीचे खेळाडू आपल्या संघाच्या पुढील सामन्यात निळय़ा रंगाची जर्सी परिधान करणार आहे. या सामन्यानंतर या जर्सीचा लिलाव केला जाणार आहे. सोमवारी आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये खेळविला जाणार आहे. भारतामध्ये 24 तासांत कोरोनाग्रस्तांचीं संख्या 4 लाखापेक्षा अधिक झाली आहे. प्रत्येक दिवशी किमान 3000 लोकांचा यामध्ये मृत्यू होत आहेत.