युवा समितीने घेतली जिल्हाधिकाऱयांची भेट
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावातील अनेक सामाजिक संस्थांनी आयसोलेशन केंद्रे सुरू केली आहेत. त्या ठिकाणी ऑक्सिजन टंचाई निर्माण केली आहे. तेंव्हा ऑक्सिजन पुरवठा तातडीने सुरळीत करावा, ऑक्सिजन बेड उपलब्ध करावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन चर्चा केली.
खासगी हॉस्पिटल्समधील उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला उपचार मिळणे अवघड झाले आहे. त्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी स्वखर्चातून तसेच दानशूर व्यक्तींच्या मदतीतून आयसोलेशन केंद्रे सुरू केली आहेत. त्या ठिकाणी रुग्णांना आधार मिळत आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहे. जनतेने घाबरू नये. कोणताही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. उपचाराविना कोणालाही घरी पाठविण्यात येणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी दिले आहे. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, साईनाथ शिरोडकर, अभिजित मजुकर आदी उपस्थित होते.