श्वसनाचे विकार असणाऱया रुग्णांना रात्री झोपेत श्वासोच्छ्वास करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. कित्येकदा झोपेत त्यांचा श्वास बंद पडण्याचाही धोका असतो. कोरोनाकाळात या विकाराच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून आले होते. कोरोनाची लागण झाल्यास श्वसनाचे विकार निर्माण होऊन झोपेत श्वास घेण्यास अडचण येऊ शकते.
मात्र आता या रुग्णांना दिलासा मिळेल, असे संशोधन करण्यात आले आहे. कानपूर येथील एका संशोधन संस्थेत गादी तयार करण्यात आली आहे. या गादीवर विशिष्ट स्थितीत झोपल्यास रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता पडत नाही आणि त्याचा श्वासोच्छ्वासही विनासायास सुरू राहतो, असे दिसून आले आहे.
या संशोधकाचे नाव अतुल सेठ असे असून त्यांचा गाद्या तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी ही विशिष्ट प्रकारची पॉलिथिलिनची गादी तयार केली आहे. या गादीला असा आकार देण्यात आला आहे, की त्यावर झोपलेल्या रुग्णाला श्वास घेण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. गाढ झोपेतही त्याची श्वसनक्रिया यथायोग्य पद्धतीने सुरू राहते. कोरोनाकाळात अतुल सेठ यांनी अनेक रुग्णांचे निरीक्षण केले. कोणत्या स्थितीत झोपल्यानंतर श्वासोच्छ्वासास त्रास होतो, याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. गाढ झोपेतही ही स्थिती टाळणाऱया गादीचे डिझाईन त्यांनी तयार केले. ही गादी बाहेरून ऑक्सिजन पुरवत नाही. तथापि, या गादीवर रुग्ण अशाप्रकारे झोपू शकतो, की तो स्वबळावरच व्यवस्थित श्वासोच्छ्वास करू शकतो. त्याच्या फुफ्फुसांवर विशिष्ट पद्धतीने या गादीचा दाब पडतो आणि त्यांची हालचाल गाढ झोपेतही नैसर्गिक प्रकारे होते. यामुळे कोरोनाचे गंभीर स्थितीतील रुग्ण वगळता इतरांना व्हेंटिलेटरची आवश्यकता पडत नाही, असा दावा करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांप्रमाणेच अतिलठ्ठ रुग्णांनाही झोपेत होणारा श्वासोच्छ्वासाचा त्रास या गादींमुळे कमी होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, या गादीचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करण्याची दक्षता बाळगणे आवश्यक आहे.