दहा दिवसांत काम पूर्ण करण्याची सूचना : 60 लाखाचा खर्च अपेक्षित
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील जिल्हा रुग्णालय आणि खासगी इस्पितळात ऑक्सिजन मिळत नसल्याने कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात प्रतिमिनिट 750 किलो लिटर क्षमतेने ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्प उभारणीच्या कामाचे पूजन करून शुक्रवारपासून शुभारंभ करण्यात आला.
सध्या कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. रुग्णालयांमध्ये वेळेत ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांचा जीव जात आहे. सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडची कमतरता भासत आहे. परिणामी कोरोना रुग्णांचे जीव जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी जिल्हा रुग्णालय आवारात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी प्रतिमिनिट 750 लिटर क्षमतेने ऑक्सिजन उत्पादन करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एल ऍण्ड टी कंपनी प्रकल्प राबविण्यासाठी तयार झाली
आहे.
सदर प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने तसेच राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात इंदिरा कॅन्टीनशेजारी सदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. 60 लाख रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महापालिका आणि आरोग्य खात्याच्यावतीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.
आमदार अनिल बेनके, महापालिका आयुक्त जगदीश के. एच., तसेच एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांच्या उपस्थितीत पूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी विनय दास्तीकोप, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, मनपा व आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.