जागतिक पातळीवरील ऑक्सिजन संशोधक असल्याने जगभर हळहळ
प्रतिनिधी / कोल्हापूर
ऑक्सिजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल नाव कमावलेल्या निपाणी येथील डॉ. भालचंद्र काकडे (वय 44) यांचे ऑक्सिजन अभावी निधन झाले. चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील असा परिवार आहे.
निपाणी येथील मूळ रहिवासी सध्या चेन्नईतील खासगी विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत असणारे डॉ. भालचंद्र यांना काही दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. किरकोळ लक्षणे असल्याने चार दिवस त्यांनी घरातच उपचार घेतले. परंतू प्रकृती बिघडल्याने त्यांना चेन्नई येथील एका सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसाच्या उपचारानंतर त्यांची प्रकृतीत सुधारली होती. ते व्हेंटेलेटरवर असले तरी उपचाराला चांगला प्रतिसाद देत होते. मंगळवारी रात्री अचानक या रूग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपल्याने १० रूग्णांचा तडफडून मृत्यू झाला. यामध्ये डॉ. काकडे यांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा वापर करून विविध क्षेत्रात काय करता येईल याचे संशोधन सुरू केले.
त्यांनी केलेल्या संशोधनात त्यांना सात पेटंटही मिळवली. जपान, अमेरिकेतील फेलोशिपही त्यांना मिळाली होती. आंतरराष्ट्रीय संशोधक म्हणून त्यांचे जगभर नाव होते. ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या या संशोधकाचा केवळ ऑक्सिजन पुरवठा थांबल्यामुळे अंत झाला. त्यांच्या जाण्याने संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांचा मृत्यू समाजाला चटका लावणारा ठरला.