प्रतिनिधी/ बेळगाव
रुग्णावर उपचार करताना गळतीमुळे ऑक्सिजन सिलिंडरला आग लागून एकच धावपळ उडाली. रविवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागात ही घटना घडली असून एक डॉक्टर व वॉर्डबॉय जखमी झाले आहेत. केवळ सुदैवाने दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
डॉक्टर वाणी (वय 24), यल्लाप्पा कांबळे (वय 33) रा. हंगरगा अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यांच्या हातापायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर आपत्कालीन विभागात सेवा बजावणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी घाबरून गेले होते. पीपीई किटने पेट घेतल्याची घटनाही घडली आहे.
तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एच. एम. शिवकुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील पथक सिव्हिल हॉस्पिटल परिसरात दाखल झाले. तोपर्यंत सिलिंडरमधील ऑक्सिजन संपला होता. कर्मचाऱयांनी तो सिलिंडर बाहेर आणून ठेवला. या घटनेनंतर मात्र आणखी सुरक्षितता बाळगण्यात आली आहे.
रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आपत्कालीन विभागात उपचारासाठी एक रुग्ण दाखल झाला. त्याला ऑक्सिजनची गरज होती. ऑक्सिजन लावण्यासाठी कर्मचाऱयाने सिलिंडरचा कॉक फिरविला, त्यावेळी अचानक आगीचा भडका उडाला व मोठा आवाज झाला. जवळच असलेल्या डॉक्टरच्या हातापायांनाही दुखापत झाली. कर्मचाऱयांनी प्रसंगावधान राखून कॉक बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीमुळे तो प्रयत्न शक्मय झाला नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गळती व आगीच्या घटनेनंतर सिलिंडर स्वत:भोवती गोल फिरत होता. तांत्रिक दोषामुळे ही घटना घडली आहे की आणखी कशामुळे? याचा उलघडा झाला नाही.
आवाजामुळे आपत्कालीन विभागात गर्दी जमली होती. नेमक्मया याचवेळेला एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांना वैद्यकीय तपासणीसाठी या विभागात आणले होते. पोलिसांनी त्यांना तातडीने पोलीस वाहनात बसविले. डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी या घटनेने हादरून गेले आहेत.