ऑक्सिजनअभावी शहरातील रुग्णांसह हॉस्पिटलची परिस्थितीसुद्धा गंभीर : नवीन रुग्ण दाखल करून घेणे होतेय कठीण
प्रतिनिधी / बेळगाव
ऑक्सिजनअभावी शहरातील रुग्णांची परिस्थितीच नव्हे तर हॉस्पिटलची परिस्थितीही गंभीर झाली आहे. हॉस्पिटल्सनाही सिलिंडर उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. सध्या हॉस्पिटल्समध्ये दाखल असलेल्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज भासत आहे. त्याचवेळी नव्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र डॉक्टरांनासुद्धा नवीन रुग्ण दाखल करून घेणे कठीण होऊ लागले आहे.
एकीकडे शहरातील सामाजिक स्वयंसेवी संस्थांतर्फे पुरविला जात असणारा ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा सरकारने स्थगित केला आहे. काकती येथे असलेल्या बेळगाव ऑक्सिजन प्लांटमधून कार्यकारी संचालक वेंकटेश यांनी आजपर्यंत 6500 हून अधिक ऑक्सिजन सिलिंडर्स मोफत दिले आहेत. त्यांनी स्वयंसेवी संस्थांना दिलेल्या मोफत ऑक्सिजन सिलिंडर्समुळे अनेकांना लाभ झाला.
मात्र गेल्या आठवडय़ापासून ऑक्सिजन सिलिंडर्सची टंचाई तीव्रतेने जाणवत आहे.
हॉस्पिटल्समधील रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध नाहीत. दुसरीकडे काही करून त्यांना बरे करा, असा नातेवाईकांचा आक्रोश सुरू असतो. असलेल्या रुग्णांनाच सिलिंडर्स मिळत नसताना नवीन रुग्ण दाखल कसे करून घ्यायचे, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.
खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करणे सरकारनेच बंधनकारक केले आहे. त्यांनी असे रुग्ण दाखल करून घेतल्यानंतर परिसरातील नागरिक त्याला आक्षेप घेत आहेत. म्हणजेच एकीकडे जनतेचा विरोध, दुसरीकडे ऑक्सिजन सिलिंडर्सची टंचाई व तिसरीकडे नातेवाईकांचा दबाव अशा तिहेरी कोंडीत डॉक्टर सापडले आहेत. त्यातच प्रशासनाने हॉस्पिटल्सवर नोडल अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. ते सर्व तपशील लिहून घेत आहेत. परंतु पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. काही डॉक्टरांनी नुकतीच जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली व ऑक्सिजन सिलिंडरबाबत त्यांच्याशी चर्चा केली. मात्र ऑक्सिजन सिलिंडर्सची टंचाई सर्वत्रच आहे. लवकरात लवकर ते उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी दिले.
काही खासगी संस्था घरी असणाऱया रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करत आहेत. त्यांना कोठून ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही रुग्णांना घरपोच सिलिंडर्स देत असल्याने हॉस्पिटल्सवरील ताण कमी झाला आहे, असे स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
काकती येथील ऑक्सिजन प्लांटचे वेंकटेश यांनी प्रयत्नांची शर्थ करून शक्मय तेवढे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाशी त्यांच्या सतत बैठका सुरू आहेत. परंतु सरकारनेच खासगी स्वयंसेवी संस्थांना ऑक्सिजन सिलिंडर्स देण्यावर निर्बंध आणल्याने त्यांचे हात कायद्याने बांधले आहेत.
समन्वय होणे आवश्यक
सध्या ऑक्सिजन सिलिंडर्सचा प्रश्न गंभीर बनला आहे. आयएमए, प्रशासन व ऑक्सिजन प्लांटचे संचालक यांच्यात समन्वय होणे आवश्यक आहे. ऑक्सिजन सिलिंडर्स हे ठराविक परिस्थितीतच रुग्णांसाठी उपयुक्त ठरतात. हे नागरिकांनी समजून घ्यावे. परस्परांवर दोषारोप यापलीकडे जाऊन समन्वय हाच उपाय होऊ शकतो.
दोन दिवसात समस्या दूर होईल! जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेतली असता ऑक्सिजन सिलिंडर्सची टंचाई सर्वत्रच आहे. आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. येत्या दोन दिवसात ही समस्या दूर होईल, असे ते म्हणाले. हॉस्पिटल्सना ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवठा करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या स्वयंसेवी संस्थांवर निर्बंध आणले आहेत. आदेशाचे पालन करणे हे सर्वांनाच बंधनकारक आहे. परंतु लवकरात लवकर या समस्येवर निश्चितच तोडगा निघेल, असे त्यांनी स्पष्ट केले.