रुग्णाला घरपोच दिला ऑक्सिजन सिलिंडर
प्रतिनिधी / ओटवणे:
आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून आता रुग्णांना त्यांच्या निवासस्थानीच ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा पुरविण्यात येत आहे. सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा गावातील बामणवाडी येथील शिवराम विनायक केरकर यांना नीतेश राणे यांच्या सहकार्यातून त्यांच्या घरीच ऑक्सिजन सुविधा पुरविण्यात आली. त्यांच्या या सहकार्याबद्दल केरकर यांची पत्नी तसेच मुलगा सचिन यांनी राणे यांचे आभार मानले.
केरकर यांची तब्येत अचानक बिघडल्याचे समजताच त्यांचा मुलगा सचिनने तात्काळ मुंबईतून घरी येत वडिलांवर औषधोपचार सुरू केले. मात्र, त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावत चालल्यामुळे केरकर कुटुंबीय चिंतेत पडले. त्यानंतर त्यांना कुडाळ येथील खासगी कोविड केअर सेंटरमध्ये नेले. मात्र, तेथे बेड उपलब्ध नसल्याने ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले. त्या ठिकाणीही हीच परिस्थिती पाहिल्यावर त्याने वडिलांना घेऊन पुन्हा घर गाठले. घरी परतल्यावर तर प्रकृती ऑक्सिजनअभावी अधिकच बिघडली होती.
कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांना याबाबत समजताच त्यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांकरवी केरकर यांच्या घरी ऑक्सिजन सिलिंडर पाठवून दिला. या ऑक्सिजनचा पुरवठा करताच त्यांची ऑक्सिजन पातळी 90 पर्यंत वाढून प्रकृतीत सुधारणा झाली. याबाबतची माहिती आरोंदा जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते शेखर गावकर यांना कळताच त्यांनी केरकर कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना लागणारी सर्वतोपरी वैद्यकीय मदत करू, अशी ग्वाही दिली.
ऑक्सिबँक ठरली संजीवनी
आमदार राणे यांची ऑक्सिजन बँक ही संकल्पना कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरू लागली आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते, त्यांना घरपोच जंबो ऑक्सिजन सिलिंडर दिला जात आहे. तिरोडा येथील शिवराम केरकर यांनाही ऑक्सिजनची गरज असल्याने या ऑक्सिबँकच्या माध्यमातून त्यांच्या निवासस्थानी ऑक्सिजन पुरविण्यात आला. आमदार राणे हे आपल्यासाठी देवदूत ठरले, अशा शब्दात केरकर कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.