राज्य सरकार विचाराधीन – तज्ञांच्या सल्ल्यांविषयी चर्चेनंतर घेणार ठोस निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास राज्य सरकार सरसावले आहे. येत्या काही दिवसांत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाला तर या महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या प्रारंभी शाळा ‘ऑफलाईन’ सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. यासंबंधी राज्य सरकार तज्ञांशी चर्चा करीत असून लवकरच ठोस निर्णय होणार असल्याचे समजते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यातील शाळा-महाविद्यालये सुमारे 15 महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत असले तरी ग्रामीण भागातातील मुलांना अनुकूल परिस्थिती नाही. त्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याचा दबाव शिक्षण तज्ञांनी सरकारवर आणला आहे.
शिक्षण तज्ञांच्या समितीने शाळा सुरू करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. शिवाय कर्नाटक राज्य प्राथमिक-माध्यमिक शिक्षण संघटनेने कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्ल्याप्रमाणे शाळा सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यामुळे सरकारने सद्यपरिस्थितीचा विचार करून पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
लवकरच निर्णय घेण्याची शक्यता
राज्यात जुलैच्या अखेरीस शाळा सुरू करण्यासंबंधी चर्चा सुरू असल्याचे समजते. मात्र, याविषयीच्या वृत्ताला राज्य सरकारकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. राज्यात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर महाविद्यालये, माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. सहावी आणि सातवीचे वर्ग विद्यागम पद्धतीने भरविण्यात आले होते. एकेक विद्यार्थी महाविद्यालयाकडे वळत असतानाच कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली त्यामुळे महाविद्यालये पुन्हा बंद करून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यात आले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा विचार सरकारने चालविला असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.