बेळगाव
हुंचेनहट्टी क्रॉसजवळ ऑटोरिक्षा उलटून बेंगळूरहून बेळगावला आलेल्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर आणखी एका विद्यार्थ्यासह दोघे जण जखमी झाले. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
सबीन पहारी (वय 23, रा. बेंगळूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचा मित्र सुभेंदू (वय 20, रा. बेंगळूर) व रिक्षातील आणखी एक प्रवासी अझरुद्दिन नायकवाडी (वय 34, रा. कलईगार गल्ली) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
यासंबंधी ऑटोरिक्षा चालक अस्लम सनदीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत. सबीन पहारी व सुभेंदू दोघेही अभियांत्रिकी कॉलेजचे विद्यार्थी कामानिमित्त शुक्रवारी सकाळी बेळगावला आले होते. ऑटोरिक्षातून व्हीटीयूकडे जाताना हुंचेनहट्टी क्रॉसजवळ रिक्षा उलटून हा अपघात घडला. सबीन पहारीला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.