सेवा सिंधू पोर्टलवर अर्ज दाखल करावा लागणार
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संकटग्रस्त झालेल्यांसाठी राज्य सरकारने विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. सदर पॅकेजचा ऑटो रिक्षा, कॅब चालकांनाही लाभ मिळणार आहे. वाहन चालक परवाना व नोंदणी केलेल्या ऑटो रिक्षा, कॅब, टॅक्सी चालकांना एक वेळेसाठी 3 हजार रुपयांची मदत थेट बँकेत जमा करण्यात येणार आहे. यासाठी ‘सेवा सिंधू’ पोर्टलवर अर्ज मागविण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर तयार केले जात आहे. ही व्यवस्था तयार झाल्यानंतर अर्ज मागविण्यात येतील, अशी माहिती परिवहन खात्याने दिली आहे.
अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी 1,250 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज घोषित केले आहे. ऑटो रिक्षा, कॅब, टॅक्सी चालकांना थेट डीबीटीद्वारे मदत खात्यावर जमा करणार असल्याचे परिवहन खात्याने सांगितले आहे. मदत मिळविण्यासाठी अन्य मार्गाने अर्ज दाखल करण्यासाठी धडपड करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती परिवहन आणि रस्ते सुरक्षा विभागाच्या आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.