वृत्तसंस्था / हो ची मिन्ह
व्हिएतनाममध्ये ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी झालेल्या एका 11 वर्षीय मुलाचा मोबाइलमध्ये विस्फोट होऊन मृत्यू ओढवला आहे. मोबाइल चार्जिंगला लावून ऑनलाइन क्लासमध्ये सामील झाला होता. याचदरम्यान मोबाइलमध्ये विस्फोट झाल्याने होरपळून त्याचा मृत्यू झाला आहे.
कोरोना संकटामुळे व्हिएतनाममध्ये ऑनलाइन क्लासद्वारेच शिकविण्यात येत आहे. अशा स्थितीत एक 11 वर्षीय विद्यार्थी शाळेकडून पाठविण्यात आलेल्या व्हिडिओ लिंकद्वारे घरातून ऑनलाइन सत्रात भाग घेत होता. विद्यार्थी मोबाइल चार्जिंगला लावून क्लासमध्ये सामील झाला होता. तसेच त्याने ईयरफोनही घातले होते. पण याचदरम्यान मोबाइलमध्ये विस्फोट होत मुलाच्या कपडय़ांनी पेट घेतल्याने त्याचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती व्हिएतनामच्या शिक्षण अधिकाऱयाने दिली आहे.
या दुर्घटनेनंतर मुलाला त्वरित रुग्णालयात पोहोचविण्यात आले, पण त्याला वाचविता आले नाही. मुलगा कुठल्या प्रकारचा फोन किंवा चार्जर वापरत होता हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
व्हिएतनामच्या दान जिल्हय़ात शाळा आता सुरू झाल्या आहेत. पण कोरोनामुळे मुलांना आठवडय़ातून एक दिवस ऑनलाइन क्लासमध्ये भाग घ्यावा लागतो. संबंधित मुलगा देखील ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी झाला असता त्याच्यासोबत दुर्दैवी प्रकार घडला आहे.