उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात ऑनलाईन जुगारावर बंदीबाबत सरकारने निर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने सरकारला मंगळवारी दिला आहे. ऑनलाईन जुगार बंदीसंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश अभय ओक यांच्या विभागीय पीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे का?, असा प्रश्न केला. तसेच याविषयी ठोस निर्णय घ्या. 31 मार्च रोजी दिलेल्या आदेशाचे सरकारकडून पालन झालेले नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
ऑनलाईन जुगार बंदीबाबत 27 मे पर्यंत निर्णय घ्यावा, असा आदेश 31 मार्च रोजी राज्यांना देण्यात आला होता. यासंबंधी निर्णय घेण्यात आला नसल्याने मंगळवारी सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्व प्रकारच्या ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्यासंबंधी सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. ऑनलाईन बेटींग आणि जुगारावर तातडीने बंदी घालणे आवश्यक आहे, अशी याचिका डी. शारदा यांनी उच्च न्यायलयात दाखल केली होती.
सुनावणीवेळी राज्य सरकारच्या वकिलांनी युक्तीवाद करताना या प्रकरणात केंद्र सरकारला प्रतिवादी बनवावे, अशी विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी 22 जूनपर्यंत लांबणीवर टाकली.