सध्या बरंच काही ऑनलाईन होत असतं. विवाहमंडळांची जागाही आता मॅट्रिमोनिअल साईट्सनी घेतली आहे.ऑनलाईन माध्यमातूनही संपर्क वाढताना दिसतो. फेसबुकवरील अनोखळी व्यक्ती कधी मैत्रीण किंवा मित्र बनते हे आपल्याला कळतही नाही. मात्र असे ऑनलाईन नातेसंबध धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमची आर्थिक़ फसवणूकही होऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन मैत्री करताना अधिक काळजी घ्यायला हवी. फसवणूक टाळण्यासाठी काय करता येईल? जाणून घेऊ.
* ऑनलाईन डेटिंग ऍप्स किंवा वेबसाईट्सच्या वापर काळजीपूर्वक करायला हवा. इथे फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते. बनावट प्रोफाईल्स, सायबर बुलिंग, सायबर डिफेमेशन, सायबर स्टॉकिंगसारख्या घटना घडू शकतात. सध्या ऑनलाईन शोषणाचं प्रमाणही वाढत आहे.
* या ऍप्सच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती काढून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. एखाद्याचा बदला घेण्याच्या उद्देशानेही या साईट्सचा वापर होऊ शकतो. त्यामुळे पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणालाही आपली माहिती, फोन नंबर, पत्ता देऊ नका.
* ऑनलाईन डेटिंग किंवा फेसबुकवरील माहितीच्या आधारे बनावट प्रोफाईल तयार केली जाऊ शकते. तसंच या माध्यमातून पैशांची मागणीही होऊ शकते. बँक खातं, क्रेडिट कार्डचा चुकीचा वापरही होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आर्थिक बाबींची माहिती कोणालाही देऊ नका.
* ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी कोणत्याही साईट्सवर एकापेक्षा अधिक प्रोफाईल पिक्चर अपलोड करू नका. तसंच प्रायव्हसी ऑप्शनचा वापर करा. साईटवरील माहिती सार्वजनिक होणार नाही याची खबरदारी घ्या.
* ऑनलाईन डेटिंग ऍप्सवर वैयक्तिक माहिती देऊ नका.
* डेटिंग किंवा कोणतंही ऍप डाउनलोड करण्याआधी ते कोणत्या परवानग्या विचारतं ते पाहून घ्या. सगळ्या परवानग्या देऊ नका. * फारचं चर्चेत नसलेलं ऍप डाउनलोड करू नका. ही ऍप्स हॅक होऊ शकतात किंवा डाउनलोड केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.