वृत्तसंस्था/ लंडन
कोरोनामुळे जगातील सर्वच व्यवहार ठप्प पडले असून क्रीडा जगतालाही याचा मोठा फटका बसला आहे. बुद्धिबळ जगत मात्र याला अपवाद ठरले असून आजपासून ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 ते 10 मे दरम्यान ही स्पर्धा होईल. भारतीय संघाचे नेतृत्व माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद व युरोपियन संघाचे नेतृत्व गॅरी कॅस्पारोव्ह संघाकडे सोपवण्यात आले आहे. यात भारतासह रशिया, अमेरिका, युरोप, चीन आणि शेष विश्व असे सहा संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये दि. 5 ते 9 मे दरम्यान साखळी लढतींच्या दोन फेऱया होणार आहेत. यानंतर, पहिल्या दोन स्थानी राहणारे संघ 10 मे रोजी विजेतेपदासाठी लढतील. स्पर्धेचे यु टय़ुब, ट्विटर, फेसबुक लाईव्ह यासह ऑनलाईनची विविध माध्यमे आणि अधिकृत संकेतस्थळांवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.