वृत्तसंस्था/ बर्लिन
बुद्धिबळाच्या पहिल्या ऑनलाईन नेशन्स कप स्पर्धेचे अपेक्षेप्रमाणे अग्रमानांकित चीनने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांची अमेरिकेविरुध्दची लढत 2-2 अशी बरोबरीत सुटली. मात्र दोन फेऱयांच्या साखळी लढतींमध्ये पहिल्या स्थानी राहिल्याने चीनला विजेते घोषित करण्यात आले. सहा संघांच्या या स्पर्धेत भारताला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. या स्पर्धेत जेतेपद पटकावलेल्या चीनला 48 हजार डॉलर्सचे तर दुसऱया स्थानावरील अमेरिकेला 36 हजार तर भारतासह इतर चार संघाना प्रत्येकी 24 हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले.
सहा संघाच्या या ऑनलाईन स्पर्धेत चीनला विजेतेपद मिळाले असले तरी शनिवारी शेवटच्या साखळी सामन्यात ते अमेरिकेकडून पराभूत झाले होते आणि अंतिम लढतीतही ते अमेरिकेला मात देऊ शकले नाहीत. मात्र साखळी फेरीच्या शेवटी मिळवलेले सर्वाधिक गुण त्यांना विजेतेपद मिळवून देणारे ठरले. चेस डॉट कॉम या संकेतस्थळाने ही स्पर्धा आयोजित केली होती.
अंतिम लढतीत बलाढय़ अमेरिकेविरुद्ध चीनचा बरोबरीचा डाव
अंतिम लढतीत डिंग लिरेन व अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा दरम्यानचा डाव बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या लढतीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाने वेई यी याचा पराभव केला. यानंतर यू यांग यी याने वेस्ली सो याला मात देत चीनला विजेतेपदासाठी आवश्यक गूण मिळवून दिला. शेवटच्या डावात हू यिफानला आयरिना क्रशला मात देण्यात अपयश आले. यामुळे ही लढत 2-2 अशी बरोबरीत संपवली.
भारतीय संघ पाचव्या स्थानी
भारतीय संघ शेवटच्या साखळी लढतीत रशियाकडून दीड विरुध्द अडीच अशा फरकांनी पराभूत झाला. या लढतीत माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदने विश्रांती घेतली होती. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारताला केवळ एकच विजय मिळवता आला. तसेच विदीथ गुजराथी व बी अधिबान यांना अपेक्षित कामगिरी साकाराता आली नाही.
स्पर्धेतील अंतिम क्रमवारी –
1. विजेते – चीन (17 गुण)
2. उपविजेते – अमेरिका (13 गुण)
3. तृतीय – युरोप (13 गुण)
4. चतुर्थ – रशिया (8 गुण)
5. पाचवे – भारत (5 गुण)
6. सहावे- शेष विश्व (4 गुण)