मगोतर्फे धारबांदोडा जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / धारबांदोडा
ग्रामीण भागात इंटरनेटची कनेक्टीविटीची समस्या असताना आणि अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन तसेच इतर सुविधा नसताना सरकारने नवे शैक्षणिक वर्ष सुरु करून ऑनलाईन माध्यमातून वर्ग भरविण्याचे निर्देश विद्यालयांना दिले आहेत. हे योग्य नसून याचा मगो पक्ष निषेध करीत आहे. ऑनलाईन वर्ग भरवणे अत्यंत चुकीचे असून शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण दिलेले नाही. त्यामुळे याचा मुलांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होणार असल्याचे मगोपचे नेते सुदिन ढवळीकर म्हणाले.
धारबांदोडा उपजिल्हाधिकाऱयांना याबाबत निवेदन सादर केल्यानंतर ते बोलत होते. येत्या पंधरा दिवसात इंटरनेटची कनेक्टीविटी सुधारणा घडविण्याबरोबरच गरीब विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर पणजीत आझाद मैदानावर धरणे आंदोलन पालकांसह करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सर्व सामान्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी गावोगावी शाळा सुरु केल्या. मात्र भाजप सरकारने आज शिक्षणावर दुर्लक्ष केले आहे, असे सांगून संजीवनी साखर कारखाना व खाण उद्योग भाजप सरकारने बंद पाडला असा आरोप करून धारबांदोडा नव्या इमारतीचे काम अजूनपूर्ण झालेले नाही. शिवाय शौचालय व वीज सारख्या सुविधांची वानवा या इमारतीत आहे, असे ते पुढे बोलताना म्हणाले.
सावर्डे मतदारसंघामध्ये मगोचे तीन उमेदवार इच्छुक आहेत. त्यापैकी योग्य अशा उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल. शिवाय निवडून आल्यानंतर उमेदवाराने पक्षांतर करू नये यासाठी खास उपाय योजना केली जाईल, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.