निम्याहून अधिक विषयांच्या परीक्षा संपल्या -उर्वरीत विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीनेच
प्रतिनिधी / कोल्हापूर
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उद्य सामंत यांनी राज्यातील 13 आकृषी विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतू शिवाजी विद्यापीठाच्या 22 मार्चपासून पदवी, पदव्युत्तर आणि व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. आतापर्यंत निम्याहून अधिक परीक्षा पार पडल्या आहेत. या निर्णयानंतर ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसह उर्वरीत विषय आणि पदवी प्रथम वर्षाच्याही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ ऑनलाईन परीक्षेत एक पाऊल पुढे आहे, म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
राज्यभरात 13 आकृषी विद्यापीठ आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पध्दतीने परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य शासनाने यापुर्वी दिला होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही ऑपशन निवडण्याची संधी देण्यात आली होती. यात 85 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर 15 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाईनचा ऑपशन निवडला होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यापीठ परीक्षांमध्ये एकसुत्रीपणा यावा म्हणून सर्वच आकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय मंत्री सामंत यांनी जाहीर केला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयानुसार आता शिवाजी विद्यापीठातील सर्वच परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. महाविद्यालय पातळीवर होणाऱया पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षाही ऑनलाईन पध्दतीने घेण्याच्या सूचना आज (दि. 23) विद्यापीठ प्रशासनाकडून महाविद्यालयांना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.
त्या 17 हजार विद्यार्थ्यांना द्यावी लागणार ऑनलाईन परीक्षा
विद्यापीठ अंतर्गत पदवी, पदव्युत्तर, व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या 17 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑफलाईन ऑपशन निवडला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सोयीनुसार ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा ऑपशन निवडण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या परीक्षा संपल्यानंतर ऑफलाईनमधील 17 हजार विद्यार्थ्यांसह तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देवू न शकलेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होतील.
अडीज लाख विद्यार्थ्यांची माहिती उच्च शिक्षण विभागाला देणार
देशातील 18 वर्षावरील सर्व लोकांना कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच विद्यापीठातील 18 वर्षावरील विद्यार्थ्यांचा डेटा उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने मागवला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील 2 लाख 57 हजार विद्यार्थ्यांचा डेटा उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाला दिला जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, फोन नंबर, ईमेल आयडी, वर्ग रासह सर्व माहिती असेल.