प्रतिनिधी/ रत्नागिरी
शेकडो बनावट वेबसाईट्सच्या माध्यमातून हजारो लोकांना कोटय़वधींचा ऑनलाईन गंडा घालणाऱया आंतरराज्यीय रॅकेटमधील आरोपीला रत्नागिरी तालुक्यात जयगड-वाटद खंडाळा येथे अटक करण्यात आली आहे. सायबर सेलने शोधून काढलेल्या या रॅकेटमधील 6 पैकी 5 जणांना बिहार व पश्चिम बंगाल येथे अटक करण्यात आली होती. यातील एकजण पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. पलायन केलेल्या बिहारमधील या आरोपीला अन्य दोघांसह वाटद खंडाळा येथे अटक करण्यात आली आहे. 10 हजारांहून अधिक लोकांना गंडा घालणाऱया रॅकेटमधील आरोपी गेले काही दिवस जयगड परिसरात वास्तव्याला होता, हे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी विवेक अजय प्रसादकुमार (24), दीपक मधुसूदन प्रसादसिंग(45) व सविता दीपकसिंग (38, वाटद खंडाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गेली दोन वर्षे बनावट वेबसाईट्सच्या माध्यमातून हजारो लोकांना कोटय़वधींचा गंडा घालणाऱया आंतरराज्यीय टोळीचा सायबर सेलने काही दिवसांपूर्वी छडा लावला होता. गेल्या आठवडय़ात विविध तारखांना बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये यातील 5 आरोपींच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश आले होते. मात्र यावेळी बिहारमधील एका आरोपीने पलायन केले होते. हा आरोपी महाराष्ट्रात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याचा तांत्रिक पध्दतीने मार्ग काढण्यात आला असता तो रत्नागिरी जिह्यात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या दृष्टीने अत्यंत गुप्तपणे कारवाई करत पोलिसांनी विवेक अजय प्रसादकुमार या आरोपीला वाटद खंडाळा येथे अटक केली. संदखोल येथे गेली काही वर्षे कामाला असलेल्या व आरोपीला आश्रय देणाऱया दीपक मधुसूदन प्रसादसिंग व सविता दीपकसिंग या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपींकडून 5 मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि 1 लाखाची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. जप्त झालेल्या मोबाईल व लॅपटॉपच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती आणि पुरावे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संशयित आरोपीला आश्रय देणाऱया दोघांचा या रॅकेटमध्ये सहभाग होता अथवा कसे, हे चौकशीत स्पष्ट होणार आहे. सायबर सेलकडून रत्नागिरी पोलीस विभागाला माहिती पुरवण्यात आली होती. त्यानुसार जयगड पोलिसांनी अत्यंत सावधपणे कारवाई करत वाटद खंडाळा येथे तिघांना ताब्यात घेतले. तीनही संशयित आरोपींना मुबई सायबर सेलच्या ताब्यात देण्यात आले.
बनावट वेबसाइट्स वापरुन ऑनलाईन फसवणूकप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी 6 आरोपींना बिहार व पश्चिम बंगाल येथे अटक केली होते. या टोळीचा मास्टरमाईंड बिहारमधील एक वाणिज्य पदवीधर असून पश्चिम बंगालमध्ये मालमत्ता खरेदी करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. या बाबत संयुक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सांगितले की, या रॅकेटमधील आरोपींनी पेट्रोल पंप, डीलरशिप एजन्सीज, खासगी कर्ज, शॉपिंग साइट इत्यादी सेवा पुरवणाऱया वेबसाईट्ससारख्या भासणाऱया बनावट वेबसाईट तयार करून ही फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. या वेबसाईट्सवर प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ही टोळी लोकांकडून ऑनलाईन पैसे घेऊन त्यांची फसवणूक करत असे.
प्राथमिक तपासात केवळ दोन वेबसाईट्सच्या माध्यमातूनच त्यांनी 10 हजारांहून अधिक लोकांना 10 कोटींहून अधिक रकमेचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. आणखी 121 वेबसाईट्सच्या स्पॅनिंगचे काम सुरु असून याच पटीत हे आकडे वाढत गेल्यास काय चित्र निर्माण होईल, या कल्पनेनेच तपास यंत्रणेचे डोळे विस्फारले आहेत.