शिरवळ येथील घटना, परदेशी अनोळखीने घातला गंडा
प्रतिनिधी/ सातारा
मोबाईल पे, ऑनलाईन बँकिंग या सुविधा वापरणे हे फार अवघड राहिलेली गोष्ट नाही. मात्र, अशा पध्दतीने व्यवहार करताना काळजी घेतली नाही तर लाखो रुपयांची टोपी कोणीही घालून जावू शकते. असा प्रकार शिरवळ (ता. खंडाळा) येथे घडला असून एकाला परदेशातील अनोळखीने अनाथ मुलांना फंड दान करण्याचे खोटे कारण सांगत तब्बल 3 लाख 54 हजार 500 रुपयांना एका अनोळखीने गंडा घातला आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखीने दि. 17 डिसेंबर 2020 ते 2 फेब्रुवारी 2021 या कालावधीत 9362268839, 12014039011 व 9172077279 वरुन तसेच ई-मेल आयडी हाताळत मोबाईल फोन व व्हाटसऍपद्वारे सुयश विजय गुंड (वय 20, सध्या रा. फुलोरा हौ. सोसा. पंढरपूर फाटा, शिरवळ, ता. खंडाळा, मूळ रा. उपळाई, ता. माढा) यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चांगला संवाद करत त्या परदेशातील व्यक्तीने गुंड यांना मला भारतातील अनाथ मुलांना फंड डोनेट करायचा असल्याचे सांगितले.
बहुतेक हा फंड लाखो रुपयांमधील असल्याने गुंड त्या अमिषाला बळी पडले असावेत. गुंड यांचा विश्वास प्राप्त केल्यावर त्याने अनोळखीने त्यांना त्याच्या विविध बँक खात्यावर 3 लाख 54 हजार 500 रुपये भरुन घेतले. अनाथ मुलांना लाखो रुपयांचा फंड देण्याचे आश्वासनही तो देत राहिला. मात्र, ना अनाथ मुलांना फंड आला ना त्याने पुन्हा गुंड यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर गुंड यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात जावून त्या मोबाईल क्रमांक व इतर माहितीनुसार अनोळखी व्यक्तीविरुध्द फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. आता या परदेशी अनोळखीला शोधून आणण्याचे काम शिरवळ पोलिसांना करावे लागणार असून या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश हजारे करत आहेत.