चुरशीच्या अंतिम लढतीत नाकामुरावर विजय, डिंगला तिसरे स्थान
वृत्तसंस्था/ चेन्नई
वर्ल्ड चॅम्पियन नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने ऑनलाईनवरील सर्वात मोठय़ा बक्षीस रकमेच्या बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपदही पटकावण्याचा पराक्रम केला. चुरशीच्या अंतिम फेरीत त्याने अमेरिकेच्या हिकारु नाकामुराचा 2.5-1.5 गुणांनी पराभव करीत हे यश मिळविले.
या लढतीतील पहिला डाव अतिशय अटीतटीचा झाला. त्यात कार्लसनने एंडगेमची ताकद पुन्हा एकदा दाखवत विजय मिळविला. 29 वर्षीय कार्लसनने हा डाव जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. पण नाकामुरा आपल्याकडून काय चूक घडली, याबद्दल चकित झाल्याचे दिसत होता. दुसऱया डावात कार्लसनने आपली आघाडी टिकवून ठेवण्यासाठी अतिभक्कम दृष्टिकोन अवलंबला. पण नाकामुराने शानदार खेळ करीत हा डाव जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरा डावही अधिक चुरशीचा झाला. कार्लसनने पटावरील स्थिती भक्कम बनविली आणि नाकामुरावर दडपण आणण्यास सुरुवात केली होती. नाकामुरा कोसळण्याच्या मार्गावर होता, तरीही त्याने झुंजार लढत दिली. पण अखेर कार्लसनला तो विजयापासून रोखू शकला नाही.
कार्लसनला 2-1 अशी आघाडी मिळाल्याने त्याला चौथ्या डावात केवळ बरोबरीची गरज होती आणि त्याने ती सहज साध्य करीत जेतेपद निश्चित केले. नाकामुराने या डावात विजयासाठी धडपड केली. पण कार्लसन अडचणीत असताना त्याचा बचाव भेदण्याची संधी त्याने घालविली आणि कार्लसनने नंतर डाव बरोबरीत राखत आवश्यक असलेला अर्धा गुण वसूल केला. ‘ही स्पर्धा जिंकणे ही माझ्यासाठी फार मोठी कामगिरी असून मी अतिशय खुश आहे,’ अशा शब्दांत कार्लसनने आनंद व्यक्त केला. गेल्या दोन आठवडय़ात या ऑनलाईन स्पर्धेने मोठी उत्सुकता निर्माण केली होती, त्यावर तो खुश असल्याचे दिसले. ‘या स्पर्धेचा फॉरमॅट यशस्वी ठरला असून त्यात विशेषतः उपांत्य फेरीत रोमांचक चुरस पहावयास मिळाली. याशिवाय लिरेन डिंगविरुद्धही मला संघर्ष करावा लागला. वैयक्तिक विचार करता, मी एकदम खुश आहे,’ असेही तो म्हणाला.
त्याला जेतेपदाचे 70,000 डॉलर्सचे पहिले बक्षीस मिळाले तर नाकामुराला 45,000 डॉलर्सचे दुसरे बक्षीस मिळाले. चीनच्या लिरेन डिंने तिसरे (30,000 डॉलर्स), फॅबियानो कारुआनाने चौथे (30,000), इयान नेपोमनियाचीने पाचवे (22,500), अलिरेझा फिरौजाने सहावे (20,000), अनिश गिरीने सातवे (17,500), फ्रान्सच्या मॅक्झिम व्हॉशियर लॅग्रेव्हने आठवे (15,000) स्थान मिळविले. या स्पर्धेसाठी एकूण 250,000 डॉलर्स बक्षीस ठेवण्यात आले होते.