प्रतिनिधी/ रत्नागिरी
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर खेळांप्रमाणेच बुद्धिबळाच्या प्रत्यक्ष स्पर्धांचे आयोजन जरी बंद असले तरी ऑनलाईन स्वरूपात मात्र अनेक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. रत्नागिरी शहरातील अनेक गुणवान बुद्धिबळपटूंनी या स्पर्धांमधून सहभागी होत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
कै. अनिल कानविंदे स्मृति महाराष्ट्र दक्षिण विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिह्यातून क्रिश डोईफोडे याने प्रथम, सौरिश कशेळकर याने द्वितीय, गीत देसाई हिने तृतीय तर आदिती पाटीलने चतुर्थ स्थान प्राप्त केले. तसेच आर्यन गोडबोले, अनुराग केळकर, वेद डोईफोडे, निधी मुळ्ये यांनी वयोगटात व रमा कोल्हटकर हिने मुलींच्या गटात बाजी मारली.
तसेच प्रतिरंग चेस अपॅडमी चिपळूणतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा खुल्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरीतील वरद पेठे याने प्राप्त केले. रत्नागिरीच्याच आर्यन गोडबोले याने उपविजेतेपद, सिद्धांत सावंतने तृतीय तर सौरिश कशेळकर याने पाचवा क्रमांक पटकावला. आशय मयेकर बिलो तेराशे फिडे मानांकन गटात प्रथम, क्रिश डोईफोडेने पंधराशे फिडे मानांकन गटात द्वितीय तर आदिती पाटील हिने अनरेटेड गटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.
रत्नागिरीतील मॅजिक स्क्वेअर चेस अपॅडमीतर्फे सातत्याने चेस 960 प्रकारातील खुल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या ऑनलाईन स्पर्धात अनेक राज्यांमधील खेळाडू सहभागी होतात. या थोडय़ा वेगळ्या प्रकारातील नुकत्याच झालेल्या स्पर्धेत रत्नागिरीमधून अलंकार कांबळे, प्रणव मुळ्ये व ज्योतिरादित्य गडाळे यांनी पारितोषिके प्राप्त केली.