प्रतिनिधी / जयसिंगपूर
यड्राव येथील शरद इन्स्टिट्युटने लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून ऑनलाईन लेक्चर, गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असाईनमेंटस, क्वीज असे विविध माध्यम वापरुन अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. त्याला विद्यार्थी व पालक वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. शरद इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक व शरद अॅग्रीकल्चरच्या सर्व प्राध्यापकांनी विषय व टॉपिकनुसार 800 व्हिडीओ लेक्चर तयार करुन युट्युब चॅनेलवर अपलोड केले आहेत. पाच हजार विद्यार्थ्यांकडून त्यांचे अवलोकन होत असून याही काळात घर बसल्या विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. संस्थेने तंत्रज्ञानाचा वापर करुन लॉकडाऊनमुळे होणा-या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीवर मात केली आहे.
अभियांत्रिकी शिक्षणाचे दुसरे सत्र मध्यावर येण्यापूर्वीच कोरोना व्हायरसमुळे देशभरात शाळा, महाविद्यालय बंदच निर्णय घेण्यात आला. दिवसेंदिवस लॉकडाऊन वाढतच चालला आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होणार कसा आणि विद्यार्थी परिक्षेला सामोरे जाणार कसे असा प्रश्न संस्थाचालक व प्राध्यापक यांच्यासमोर होता. त्याच्यावर शिक्षणसंस्था आणि प्राध्यापकांनी उपाय शोधून ऑनलाईन लेक्चरची शृखंला तयार करुन ती युट्युबवर अपलोड केले आहेत. त्याची लिंक विद्यार्थ्यांमध्ये शेअर करुन अभ्यासक्रम पूर्णत्वाकडे नेण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळले आहे.
शरद इंजिनिअरिंगच्या शिवाजी विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्णत्वाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. लॉकडाऊनपूर्वीच पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम 10 टक्के तर अॅग्रीकल्चरच्या प्रथम वर्षाचा 30 टक्के अभ्यासक्रम राहिला होता. तो अभ्यासक्रम ऑनलाईनच्या माध्यामात पूर्ण करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी प्रथमवर्ष ते अंतीम वर्षापर्यंतच्या सर्व विभागाचे व्हिडिओ तयार केले आहेत.
त्याचबरोबर गुगल क्लासरुमचा वापर करुन असाईनमेंट पूर्ण करुन घेतले जात आहेत. गुगल फॉर्मव्दारे बहुविकल्प प्रश्न, गेट परिक्षा, कंपन्यांचे अॅप्टीट्युड टेस्ट तसेच ऑनलाईन परिक्षा याची तयारी करुन घेतली जात आहे. यासर्वासाठी ऑनलाईन लेक्चर, युट्युब चॅनेल, एन.पी.टी.ई.एल. लेक्चरर्स, स्वंयम, एआयसीटीईचे ऑनलाईन कोर्सेस, व्हाटसअप अशा सर्व माध्यमाचा वापर केला जात आहे.
संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापकांनी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळले आहे. विद्यार्थ्यांनाही आपल्या वेळेनुसार ते व्हिडिओ लेक्चर बघुन विषय समजून घेता येवू लागले आहे. त्यामुळे ‘घरी रहा, सुरक्षित रहा आणि शिक्षणही घ्या’ असा मोलाचा सल्ला शरद इन्स्टिट्युट ह्या उपक्रमातून आपल्या विद्यार्थी व पालकांना दिला आहे.