गुगल पे, फोन पे मध्ये येताहेत समस्या
प्रतिनिधी / बेळगाव
मोबाईल वॉलेटमधून विजेचे बिल भरणाऱया नागरिकांना अडथळे येत आहेत. गुगप पे, फोन पे यासारख्या मोबाईल वॉलेटमधून तांत्रिक कारणाने बिल भरण्यास समस्या येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन बिल भरण्याची सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
डिजीटल इंडियामुळे ऑनलाईन बिल भरणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेकजण आपल्या मोबाईलवरून विजेचे बिल भरत आहेत. गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा मोबाईल वॉलेटमधून बिल भरण्यात येते. यामुळे नागरिकांना घरबसल्या बिल भरता येत होते. बिल भरणा काऊंटरवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हेस्कॉमनेही ऑनलाईन पेमेंटची सोय उपलब्ध करून दिली होती. यामुळे काऊंटरवरचा भार काही प्रमाणात कमी झाला होता.
परंतु फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून बिल भराताना समस्या येऊ लागल्या आहेत. प्रत्येक महिन्याचे रिडींग केल्यानंतर मोबाईल वॉलेटद्वारे त्याची माहिती ग्राहकाला मिळत होती. परंतु या महिन्यात ही माहिती उपलब्ध झाली नाही. बिल क्रमांक घातला तरी ते भरले जात नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्यामुळे ही तांत्रिक समस्या लवकर सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे.
या ठिकाणी भरा वीज बिल
गुगल पे, फोन पे या दोन मोबाईल वालेटमध्ये अडचणी येत असल्या तरी अन्य मार्गांनी बिल भरता येऊ शकते. पेटीएमवर बिल भरता येऊ शकते. त्याचसोबत हेस्कॉमची बिल भरणा केंद्रे, हेस्कॉमची बेवसाईट, बेळगाव वन यामध्येही विजेचे बिल भरता येऊ शकते.
बिल भरणा केंद्रांवर बिल भरा
मोबाईल वॉलेटमधून बिल भरताना काही समस्या येत आहेत. संबंधित कंपन्यांमध्ये तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता आहे. परंतु नागरिकांनी हेस्कॉमच्या बिल भरणा केंद्रांवर व हेस्कॉम बेवसाईटवर जाऊन बिल भरावे, अशी माहिती साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांनी दिली.
-विनोद करूर (साहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)