प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन शिक्षण घेतले जात असून ते पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठीही त्रासदायक ठरत आहे. राज्यातील बहुतांश भागात इंटरनेटची कनेक्टीविटी नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणे कठीण होत असल्यामुळे सरकारने या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करावे तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे विजय भिके व दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे जोसेफ डायस उपस्थित होते.
सध्या नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण घेण्यात येत असून यात शिक्षकांमार्फत बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणा दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी हे ऑनलाईन शिक्षण त्रासदायक ठरत आहे. राज्यातील बहुतांश भागात इंटरनेटची कनेक्टीविटी नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणे कठीण होत आहे. शिकवणीही मार्गदर्शक तत्त्वाशिवाय दिली जात आहे. मार्गदर्शक तत्त्वे नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. हा गोंधळ थांबविण्यासाठी शिक्षण खात्याने तसेच सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे आवश्यक आहे. काही भागात विद्यार्थ्यांकडे गॅजेट्स नसल्यामुळे योग्यरित्या रोजच्या शिकवण्या घेणे अवघड होत आहे. एक प्रकारचा मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे असे ट्रॉजन डिमेलो यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यानीं ऑनलाईन शिक्षण आवश्यक नसल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. परंतु अजूनही ऑनलाईन शिक्षण आपल्या सोयीनुसार शिक्षक चालवित आहेत. कनेक्टीविटी आहे की नाही हे न पाहता ऑनलाईन शिकवणी सुरू ठेवली आहे. सध्या शिक्षणाचा अधिकार विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत आणि मानसिक ताण थांबवावा अशी मागणी डिमेलो यांनी केली.