जि.प.च्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, आवाजातील अस्पष्टतेमुळे अनेक सदस्य घुसले थेट सभागृहात
प्रतिनिधी/कोल्हापूर
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जाणार होती. त्यानुसार पदाधिकारी व अधिकाऱयांच्या बैठकीची सोय जि.प.च्या स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृहात केली होती. तर इतर सदस्यांची सोय संबंधित पं. स. कार्यालयांमध्ये केली होती. तरीही सत्ताधारी व विरोधी गटातील 25 सदस्य जि.प.मध्ये सभेसाठी हजर झाले. त्यामुळे त्यांच्या बैठकीची व्यवस्था राजर्षी शाहू सभागृहात केली. पण तेथे व्हि.सीद्वारे सुरु असलेले सभेचे कामकाज अस्पष्ट आवाजामुळे लक्षात येत नव्हते. यावेळे ‘शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत सभा तहकुब करण्याची मागणी करत विरोधकांनी थेट सभागृहात एन्ट्री केली. सुमारे अर्धा तास झालेल्या गोंधळानंतर सर्व सदस्यांना सभास्थळी बसण्याची परवानगी दिली. त्यामुळे ऑनलाईन सभेचा बट्टयाबोळ झाला. आणि लहानशा सभागृहामध्ये 25 जि.प.सदस्यांसह सुमारे 15 अधिकारी एकत्र आल्यामुळे सोशल डिस्टसिंगचा फज्जा देखील उडाला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार होती. त्यासाठी अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह इतर पदाधिकारी समिती सभागृहात उपस्थित होते. तर शहराच्या जवळील सदस्य शाहू सभागृहात उपस्थित राहून या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱया सभेत सहभागी होणार होते. तर इतर ठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती हे आप-आपल्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये थांबून ऑनलाईन होणाऱया सभेत सहभागी झाले होते. मात्र सभेच्या प्रारंभीच शाहू सभागृहात उपस्थित असलेल्या विरोधी सदस्यांनी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होत असलेल्या सभेच्या आवाजात स्पष्टता नसल्यामुळे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि शाहू महाराजांचा जयघोष करत विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभेच्या सुरवातीसच मोठा गोंधळ उडाला. आवाजामध्ये अस्पष्टता असल्याने पदाधिकारी ज्या समिती सभागृहात बसले आहेत, त्या ठिकाणी विरोधी सदस्यांनी धाव घेतली. आवाजामध्ये अस्पष्टता असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेच कामकाज करणे शक्य नसल्याचे विरोधी सदस्यांनी अध्यक्ष पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सभा तहकुब करा अन्यथा सदस्यांना समिती सभागृहात बसण्यास परवानगी देण्याची मागणी विरोधी सदस्यांनी लावून धरली. त्यावरून बराच वेळ गोंधळ आणि वादविवाद सुरू होता. राहुल आवाडे, प्रसाद खोबरे विजय भोजे, अरुण इंगवले आणि अध्यक्ष बजरंग पाटील तसेच उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यामध्ये शाब्दिक वादावादीचा प्रकार घडला. यावेळी विरोधी सदस्यांनी सभा तहकूब करण्याची मागणी देखील केली. अखेर सदस्यांच्या मागणीचा विचार करून अध्यक्ष पाटील यांनी विरोधी सदस्यांना समिती सभागृहाच्या ठिकाणी बसण्यास परवानगी दिल्याने या वादावर पडदा पडला.
अनेक तालुक्यातील सदस्य नॉट रिचेबल
सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरु झाल्यानंतर काही तांत्रिक करणांमुळे अनेक तालुक्यातील सदस्य सभेच्या कामकाजाशी जोडले गेले नाहीत. त्यामुळे त्यांना वगळून इतर पंचायत समित्यांमध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांचे प्रश्न आणि मागण्यांची सभेमध्ये नोंद घेतली. तरीही पदाधिकाऱयांनी संबंधित सदस्यांना आपल्या मागण्यांबाबतचे लेखी पत्र देण्यास सांगून त्याची दखल घेण्याची ग्वाही दिली.
प्रशासन आणि सत्ताधाऱयांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेऊन प्रशासन आणि पदाधिकाऱयांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर आवाजातील अस्पष्टतेचे कारण पुढे करून विरोधकांनी विनाकारण गोंधळ घातल्याचा खुलासा सत्ताधारी सदस्यांनी केला.