प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेची दहा महिन्यानंतर ऑनलाईन सभा झाली अन् ती ऑफलाईनच जास्त गाजली. त्या सभेत सातारा विकासच्या मुख्य वर्मावरच नगरसेवक अण्णा लेवे यांनी बोट ठेवले. त्यामुळे सभेच्या दुसऱया दिवसापासून पत्रकबाजीला दोन्ही साविआ आणि नविआ अशी पत्रकांची लढाई सुरु झाली. त्यातच आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रराजेंच्यातील शाब्दीक वाद यामुळे चर्चेना उधाण आले आहे. नेमके सातारा पालिकेच्या निवडणूकीत किती पॅनेल असणार याची. सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी एक होणार की एकमेकांच्या विरोधात लढणार. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे पॅनेल असणार अशाच चर्चा सुरु आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाच्या कामकाजावर केवळ साविआतील नाहीतर सर्वसामान्य सातारकरही नाराज आहेत.
कारभार असावा पारदर्शक. स्वच्छ असा. परंतु सातारा पालिकेच्या आरोग्य विभागात गोतावळय़ाच्या चाललेल्या खेळावर सातारा विकास आघाडीतले केवळ अण्णा लेवे हे एकटेच नगरसेवक नाराज नाहीत तर असे अनेक नगरसेवक ऑफ दी रेकॉर्ड आरोग्य विभागात काय काय चालते हे मीडियाच्या प्रतिनिधींकडे सांगत असतात. सातारा पालिकेच्या सभेत आरोग्य विभागाच्या कामकाजाच्या चुकीच्या कामावर अण्णांना बरोबर वर्मावर बोट दाखवले. त्याचवेळी ऑनलाईन उपस्थित न रहात आरोग्य विभागात आरोग्य निरीक्षक अशी पाटी लावणारे अधिकारी सभा संपल्यानंतर पालिकेत आल्याचे दिसत होते. सभेच्या व्हिडीओ चित्रीकरणामध्येच अण्णा लेवे यांनी केलेले आरोप त्या आरोपावरुन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दिलेले उत्तर व बनकर यांनीही सांगितलेली माहिती पाहिल्यास सभागृहात त्या दिवशी काय झाले हे पहायला मिळेल. त्यानंतर दुसऱया दिवशी अण्णांच्या आरोपांवरुन नगराध्यक्षा माधवी कदम यांचे अण्णांच्यावर तर अण्णांचे नगराध्यक्षांच्यावर तर दुसऱया दिवशी नगरविकास आघाडीचे अशोक मोने यांचे साविआवर तर साविआचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचे नविआवर पत्रक निघाले. तसेच त्याच दरम्यान, आमदार शिवेंद्रराजे यांचे आणि आमदार शशिकांत शिंदे यांचे शाब्दीक वाद सुरु झाला. त्यामुळेच सातारा पालिकेच्या येवू घातलेल्या निवडणूकीबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली. सातारा विकास आघाडीतले आणि नगरविकास आघाडीतले काही नगरसेवक आमदार शशिकांत शिंदे यांच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणूकीला अजूनही अवकाश असला तरीही ऑनलाईन सभेनंतर ऑफलाईन चर्चा चांगलीच रंगात येवू लागली आहे.