प्रतिनिधी/ चिपळूण
तुम्ही काय करता त्याची सर्व माहिती आमच्याकडे आहे, वेळ आली की जनतेसमोर ठेऊ, प्रत्येक कामात स्वत:चाच विकास असे एक ना अनेक आरोप एकमेकांवर करत नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी एकमेकांची उणीदुणी काढली. विशेष म्हणजे तब्बल सहा तास चाललेल्या या सभेत शहर विकासापेक्षा आरोप-प्रत्यारोपाच्याच फैरी झडल्या. त्यामुळे नगराध्यक्षांनी शेवटी सभा गुंडाळली. यामुळे चिडलेल्या महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱयांच्या केबिनमध्ये घुसत नाराजी व्यक्त केली.
कोरोनामुळे अनेक महिन्यांनंतर मंगळवारी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या उपस्थितीत ही ऑनलाईन सभा झाली. सभेच्या सुरूवातीला नगरसेवक अविनाश केळसकर यांनी काही चुकीच्या निर्णयांमुळे नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचा आरोप करत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. यावर कोणीही चुकीची कामे केली नसून नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती चांगली असून महाविकास आघाडीला शहराचा विकास होऊ द्यायचा नाही, असा पलटवार खेराडे यांनी केला. यावर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी तुम्ही चुका करायच्या आणि खापर आमच्या माथी फोडायचे असे सांगितले. यामुळे सभेत चांगलाच गदारोळ सुरू झाला.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडीट अद्याप का झाले नाही, असा प्रश्न महाविकास आघाडीने उपस्थित केला. यावर खेराडे यांनी त्यासाठी येणारा खर्च तुम्हीच नामंजूर केला आहे, मग ऑडीट कसे होणार, असा प्रतिप्रश्न केला. यावर महाविकास आघाडीने या कामात बऱयाच पैशाचा अपव्यप झाला असल्याचा आरोप केला. यावर खेराडे यांनी पोकळ आरोप करू नका, ऑडीट होऊद्या सर्व बाबी समोर येतील असे स्पष्ट केले. नगरसेवक परिमल भोसले यांनी बिनबुडाचे आरोप करताना विचार करावा असे त्यांनी सुनावले. यावर उमेश सकपाळ यांनी हे आम्हाला शिकवू नये, सर्वांनी माहिती आमच्याकडे आहे असे वक्तव्य केले. यावर भोसले यांनी आमच्याकडेही सर्व माहिती आहे असा आरोप केला.
निविदा न काढलेल्या कित्येक कामांची कोटय़वधी रूपयांची बिले ठेकेदारांना देण्यात आली आहेत असे सभागृहात सांगताच एकच गदारोळ माजला. असे कोणीही केले नसून प्रत्येक कामाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरी घेण्यात आली आहे. त्याच्या ठरावाला आपलीही संमती आहे हे विसरू नका असे नगराध्यक्षा खेराडे यांनी सुनावले. एकंदरीत या सभेत छोटय़ा-छोटय़ा विषयांवर वादळी चर्चा करून एकमेकांवर शितोडे उडवण्यात आले. तरीही कोरोनात काम करणाऱया कर्मचारी, आशासेविका यांना शासन निर्णयाप्रमाणे वाढीव मानधन देणे, वारस हक्काने दोघांना सेवेत घेणे, पाणी, आरोग्य विभागासाठी आवश्यक कामांसाठी अटी शर्थींवर निविदा काढणे या विषयांना मंजुरी देण्यात आली.
…अन नगराध्यक्षांनी शब्द घेतला मागे
या सभेत एकमेकांवर इतके आरोप झाले की नगराध्यक्षा खेराडे यांनी महाविकास आघाडीला उद्देशून तुमचे आत्ताचे वागणे मला माहिती आहे, पण अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हे लक्षात ठेवा असे सुनावले. यावर शशिकांत मोदी यांनी आक्षेप घेत हे शब्द मागे घ्या अशी मागणी केली, तर उमेश सकपाळ यांनी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत सभा पुढे चालू देणार नाही अशी भूमिका मांडली. यामुळे खेराड यांनी आपले शब्द मागे घेतले.
सभा गुंडाळली अन….
यावेळी नगराध्यक्षांच्या विशेष अधिकारातून झालेल्या कामांच्या अवलोकनासाठी वाचन करण्यात आले. यावर नगरसेविका फैरोजा मोडक यांनी ठराव मांडायचा असल्याचे सांगितले. मात्र मुख्याधिकारी डॉ. विधाते यांनी हे अवलोकनासाठी असल्याने ठराव मांडता येणार नाही, तुमचे म्हणणे इतिवृत्तात घेऊया असे स्पष्ट केले. मात्र मोडक यांच्यासह केळसकर, मोदी यांनी चर्चा करावी अशी मागणी केली. अखेर खेराडे यांनी पाग येथील समाज मंदिर काम, रामतीर्थ स्मशानभूमी दुरूस्ती, नूतनीकरण, शवदाहिनी हे विषय मंजूर झाल्याचे जाहीर करून सभा रद्द करीत राष्ट्रगीत घेतले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱयांच्या केबिनमध्ये घुसून नाराजी व्यक्त केली. मात्र त्यांनी हा सर्वस्वी अधिकार नगराध्यक्षांचा असल्याचे सांगितले.