वृत्तसंस्था/चेन्नई
सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या तीन फेऱयानंतर भारताच्या पी. हरिकृष्णने अर्मेनियाचा लेव्हॉन ऍरोनियनसमवेत 5 गुणांसह संयुक्त आघाडीचे स्थान मिळविले आहे. हरीने दोन डाव जिंकले आणि एक डाव अनिर्णीत राखला.
भारताच्या नंबर दोनच्या हरिकृष्णने विजयी सुरुवात करताना अमेरिकन ग्रँडमास्टर लीनियर डॉमिनिगेझवर मात केली. इराणच्या अलिरेझा फिरौझाला त्याने दुसऱया डावात बरोबरीत रोखल्यानंतर तिसऱया फेरीत रशियाच्या अनुभवी अलेक्झांडर ग्रिस्चुकवर 41 चालीत चमकदार विजय नोंदवला. या स्पर्धेच्या विजयाचा दावेदार असणारा वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन 3 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या डावात हिकारु नाकामुरावर विजय मिळविल्यानंतर दुसऱया फेरीत रशियाच्या इयान नेपोमनियाचीकडून त्याला पराभवाचा धक्का बसला आणि तिसऱया फेरीत वेस्ली सोने बरोबरीत रोखल्याने त्याला पाचवे स्थान मिळाले. स्पर्धेत दहा खेळाडूंचा सहभाग असून हरिकृष्णने काळय़ा मोहरांनी खेळताना डॉमिनिगेझवर 51 व्या चालीत मात केली होती. चौथ्या फेरीत त्याची लढत नेपोमनियाचीशी होणार आहे. त्यानंतर ऍरोनियन व कार्लसन यांच्याशी सामने होतील.
रॅपिड डावात विजय मिळविणाऱयास 2 तर ड्रॉ झाल्यास 1 गुण दिला जातो तर ब्लिट्झ डावात विजयासाठी 1 आणि बरोबरीसाठी अर्धा गुण देण्यात येतो. 250,000 डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत पाच दिवसात रॅपिडचे 9 आणि ब्लिट्झचे 18 डाव खेळविले जाणार आहेत.
तीन फेऱयानंतर नेपोमनियाची व सो यांचे प्रत्येकी 4, नाकामुरा, डॉमिनिगेझ, फिरौझा, जेफरी झिआँग यांचे प्रत्येकी 2 तर ग्रिस्चुकचा 1 गुण आहेत.