प्रतिनिधी/ मडगाव
फातोर्डा येथील एका नागरिकाची ‘ऑन लाईन’ फसवणूक केलेल्या आणि दिल्लीहून फातोर्डा येथे आणलेल्या कुश गुप्ता (30) या आरोपीला 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे. या आरोपीला फातोर्डा पोलिसांनी दिल्लीला जाऊन अटक केली होती.
फातोर्डा येथील एका नागरिकाला या आरोपीने दिल्लीहून फोन केला होता आणि आपण बँक कर्मचारी असून पीडिताच्या मोबाईलवर आलेला ‘ओटीपी’ आपल्याला देण्याची विनंती केली होती.
मात्र या ग्राहकाने तो देण्यास सुरवातीला नकार दिला तेव्हा आरोपीने पेडीट कार्डची सुविधा बंद करणार असल्याची धमकी दिल्यामुळे पीडित ग्राहकाने ‘ओटीपी’ क्रमांक दिला होता. हा क्रमांक दिल्यानंतर काही तासातच या ग्राहाकाच्या खात्यातून 19 हजार रुपयांची रक्कम गायब झाली होती.
या प्रकरणाची फातोर्डा पोलिसांना कल्पना देण्यात आली तेव्हा पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एक तुकडी दिल्लील्ला गेली आणि तेथून या आरोपीला जेरबंद केले होते.