प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेत सगळा अनागोंदी कारभार सुरू आहे.कोणाचा कोणाला धरबोळ नाही.गेले चार महिने सर्वसाधारण सभा घेण्यात आली नाही.कुठल्याही विषय समितीची सभा घेण्यात आली नाही.कोरोनामुळे सभा घेण्यात आली नसली तरी सोशल डिस्टनन्स ठेवून सभा घेण्यात यावी असे निर्देश आहेत.त्याच निर्देशानुसार सातारा पालिकेची सर्व साधारण सभा ही पालिकेच्या छ.शाहू कला मंदिरात घ्यावी, ऑन लाईन घेण्यात येऊ नये, अशी मागणी नगरविकास आघाडीचे नगरसेवक अमोल मोहिते यांनी मुख्याधिकारी रंजना गगे आणि पालिका प्रशासन अधिकारी सचिन पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ही गेल्या चार महिन्यापासून एकदा ही झालेली नाही.कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या निकष पुढे करत पालिकेची सभा ऑन लाईन करण्याचा घाट घातला आहे.पालिकेने ही ऑन लाईन सभा घेऊ नये, कारण तांत्रिक बाब म्हणून प्रत्येक ठिकाणी रेंज चांगली नाही.विरोधक म्हणून एखाद्या विषयावर विरोध करायचा झाल्यास विरोधी नगरसेवकांचा आवाज म्युट केला जाणार.विरोधकांना बोलू दिले जाणार नाही.सातारा शहरातील नागरिकांच्या हिताच्या प्रश्नावर नगरविकास आघाडी पोटतिडकीने मुद्दे मांडत असते.परंतु आवाज म्युट केल्यानंतर चर्चा करता येणार नाही.ऑन लाईन सभा घेण्यात येऊ नये, त्या ऐवजी सर्वसाधारण सभा ही पालिकेचे छ.शाहू कला मंदिर आहे.त्या मंदिरात घेण्यात यावी, शाहू कला मंदिरात नवशे लोक बसण्याची क्षमता आहे.सोशल डिस्टनन्स ठेवून शाहू कला मंदिरात चांगली सभा होऊ शकते.याबाबतीत विचार व्हावा, लवकरात लवकर सभा घेण्यात यावी,कोरोनाच्या नावाखाली कारभार बोकाळला गेला आहे, असा ही आरोप केला आहे.