मडगाव : एफसी गोवाने आपल्या उर्वरित आयएसएल फुटबॉल मोसमासाठी भारतीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आदिल खान याला करारबद्ध केले आहे. 32 वर्षीय हा बचावपटू ऑन-लोनवर हैदराबाद एफसी संघाकडून एफसी गोवाला आहे. संघाच्या बचावात आणखी भक्कमपणा यावा, यासाठी एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने आदिल खानशी करार केला आहे.
सेसा फुटबॉल अकादामीच्या तालमीत तयार झालेल्या आदिलने गोव्याच्या स्पोर्टिंग क्लुब दी गोवा संघाकडून 2008 फुटबॉल मोसमात खेळून आपल्या प्रोफेशनल फुटबॉल करियरची सुरुवात केली. कित्येक वर्षे स्पोर्टिंग क्लुब दी गोवाला खेळल्यानंतर तो कोलकाताच्या मोहन बागान संघाला गेला. इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत तो दिल्ली डायनामोज, एफसी पुणे सिटी आणि हैदराबाद एफसीला खेळला आहे. आयएसएल फुटबॉल स्पर्धेत तो आतापर्यंत 61 सामने खेळला असून 11 सामन्यात भारतीय फुटबॉल संघाचेही प्रतिनिधीत्व आदिलने केले आहे.