वृत्तसंस्था/ शांघाय
जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत विश्वविजेती महिला टेबल टनिसपटू लियु शिवेनला चीनने महिला एकेरीच्या प्रकारातून वगळले आहे. दरम्यान ती या स्पर्धेत महिला दुहेरीत आणि सांघिक प्रकारात चीनचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
चीनच्या टेबल टेनिस फेडरेशनने शिवेनला ऑलिंपिक स्पर्धेत टेबल टेनिस प्रकारातील महिला एकेरीत न खेळविण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला आहे. 30 वर्षीय लियु शिवेनने 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत चीनला टेबल टेनिस प्रकारातील सांघिक जेतेपद मिळवून दिले होते. चीनने रिओ ऑलिंपिकमध्ये टेबल टेनिस प्रकारातील सर्व म्हणजे चारही सुवर्णपदके मिळविली होती. टेबल टेनिसमधील विश्व़विजेती शिवेनने यापूर्वी एकदाही ऑलिंपिकमध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक मिळविलेले नाही.
चीनने रविवारी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेकरिता सहा टेबल टेनिसपटू संघांची घोषणा केली. यामध्ये विद्यमान ऑलिंपिक चॅम्पियन मा लाँग, विश्व टॉप सीडेड फेन झेनडाँग, लियु शिवेन, जेनमेंग आणि सन यींगशा यांचा समावेश आहे. ऑलिंपिक स्पर्धेत आतापर्यंत टेबल टेनिस प्रकारात चीनने आपले वर्चस्व राखले असून त्यांनी 32 पैकी 28 सुवर्णपदके मिळविली आहेत.