भारतीय जलतरणपटूंचा सहभाग शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी येत्या जून महिन्यात युरोपमध्ये होणाऱया जलतरण स्पर्धेत भारताचे अव्वल जलतरणपटू सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर श्रीहरी नटराज व अन्य काही जलतरणपटूंना गेल्या आठवडय़ात मोनॅकोमध्ये झालेल्या ऑलिंपिक पात्र फेरीच्या स्पर्धेत कोरोनाच्या नियमावलीमुळे सहभागी होता आले नाही.
भारतामध्ये सध्या कोरोनाच्या दुसऱया लाटेने परिस्थिती चिंताजनक बनविली आहे. त्यामुळे हवाई प्रवासावर भारतीयांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मोनॅकोमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या स्पर्धेसाठी भारतीय जलतरणपटूंच्या संघाकरिता दहा दिवसांच्या कालावधीसाठी क्वारंटाईनचा नियम शिथील करण्याची विनंती भारतातर्फे फ्रान्स शासनाकडे करण्यात आली होती. पण त्यांनी ही विनंती फेटाळल्याने भारतीय जलतरणपटूंना फ्रान्सचा दौरा रद्द करावा लागला. पुढील महिन्यात युरोपमध्ये ऑलिंपिकसाठी दोन पात्रता स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय जलतरणपटूंना क्वारंटाईनचा कालावधी एका आठवडय़ापेक्षा कमी असल्याने भारतीय जलतरणपटूंना या स्पर्धेसाठी पाठविण्याकरिता प्रयत्न चालू आहेत. आता नियोजित आराखडय़ानुसार भारतीय जलतरण संघ 19 जूनला सर्बियात होणाऱया स्पर्धेत तसेच त्यानंतर म्हणजे 25 जून रोजी इटलीत होणाऱया स्पर्धेत भाग घेईल. टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रतेच्या स्पर्धेची अंतिम तारीख 27 जून राहील.