वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2020 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताच्या ऑलिंपिक सेल मिशनतर्फे अव्वल ऍथलीटसकरिता प्रशिक्षण, साहित्य यासाठी 1.5 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
ऑलिंपिक मिशन सेलतर्फे मंजूर करण्यात आलेल्या आर्थिक निधीचा लाभ मल्ल बजरंग पुनिया, बॅडमिंटनपटू के. श्रीकांत तसेच भालाफेक करणारा निरज चोप्रा यांना मिळणार आहे. भारतीय नेमबाज अंजूम मोदगील, दिव्यनेश सिंग पनवार, मिराज, अहमद खान यांनी यापूर्वी टोकियो ऑलिंपिकचे तिकीट निश्चित केले असून या नेमबाजांना चालू वर्षांमध्ये विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. सायकलींग, जलतरण आणि ज्युडो क्रीडा प्रकाराच्या राष्ट्रीय क्रीडा फेडरेशनतर्फे 2024 आणि 2028 ऑलिंपिकसाठी दीर्घ मुदतीची योजना आखली आहे. सदर माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आली.
भारतीय ऍथलीटस श्रीशंकर मुरली, निरज, अर्पिदर सिंग यांना प्रशिक्षणासाठी क्रीडा साहित्यांची जरूरी आहे. या निधीतून त्यांना क्रीडा साहित्य पुरविले जाणार आहे. तिरंदाज अंकिता भक्त, बाँबेयाला देवी आणि दीपिका कुमारी यांना या निधीचा लाभ मिळणार आहे.